तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 5 April 2019

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जप्तीची नामुष्की; शेतकर्‍यांना एफ.आर.पी. ची रक्कम दिली नाही
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. शेतकर्‍यांना एफ.आर.पी. ची रक्कम न दिल्यामुळे साखर आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. कालच शेतकर्‍यांच्या ऊसाच्या गाळपाचे पैसे 6 महिन्यानंतर व तो ही केवळ 1400 रूपये भाव दिल्यामुळे शेतकर्‍यांनी कारखान्यावर आंदोलन केले होते, त्यापाठोपाठ आज जप्तीचे आदेश निघाल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. 

श्री.राजेंद्र अच्युतराव होके यांनी बीड जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी गळीत हंगाम 2018-19 मधील थकीत एफ.आर.पी. न दिल्याबाबत साखर आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, यात वैद्यनाथ साखर कारखान्यासह जय महेश कारखाना पवारवाडी, ता.माजलगाव या कारखान्याचा ही समावेश आहे.

वैद्यनाथ कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मध्ये शेतकर्‍यांना थकीत एफ.आर.पी. चे अनुषंगाने ऊस (नियंत्रण आदेश 1966 चे कलम 3 (8)) अन्वये थकीत एफ.आर.पी. ची रक्कम 3264.03 लाख व रूपये 3610.80 लाख तसेच ऊस नियंत्रण आदेश 1966 चे कलम 3 (3 ऐ) नुसार सदर रकमेवर 15 टक्के दराने देय होणारे व्याज या कारखान्यांकडून जमीन महसूलाची थकबाकी समजून कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती करून त्याची विहीत पध्दतीने विक्री करून संबंधितांना अदा करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी बीड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. 

साखर आयुक्त श्री.शेखर गायकवाड यांनी आजच ही नोटीस विभागीय आयुक्त श्री.सुनिल केंद्रेकर यांच्या मार्फत बजावली आहे. दरम्यान वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची नोटीस निघाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ कारखान्याने यावर्षी गाळप केलेल्या ऊसाला केवळ 1400 रूपये भाव दिला आणि हे पैसे देण्यासाठी ही तब्बल 6 महिन्यांचा विलंब लावल्याने शेतकर्‍यांमध्ये तिव्र असंतोष पसरला असतानाच आता कारखान्यावर जप्तीची ही नामुष्की ओढावली आहे.

साहेबांचे वैभव सांभाळता आले नाही

दरम्यान एके काळी आशिया खंडात नावाजलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वैभव मिळवून दिले होते, मात्र त्यांच्यानंतर कारखान्याचे हे वैभव सांभाळणे तर दुरच कारखान्यावर जप्तीची वेळ यावी, या सारखे दुसरे दुर्देव नाही, अशा प्रतिक्रीया या भागातील शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

No comments:

Post a Comment