तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

ना. पंकजाताई मुंडे यांच्या उद्या केज, परळीत झंझावाती जाहीर सभा


परळीत कार्यकर्ते शिवाजी चौकातून काढणार अभूतपूर्व प्रचार रॅली

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दि. १५ ---- भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या उद्या (ता. १६) प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केज आणि परळीत जाहीर सभा होणार आहेत. परळी येथे महायुतीचे कार्यकर्ते शहरातून अभूतपूर्व अशी प्रचार रॅली काढणार आहेत.

   लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जिल्हयात जोरदारपणे सुरू आहे. स्वतः पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या साथीने प्रचंड मेहनत घेतल्याने महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांचे पारडे जड झाले आहे. भाजप सोबतच शिवसेना, रिपाइं, रासप व रयत क्रांतीचे नेते, सर्व आजी-माजी  आमदार हे देखील डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी भेटीवर भर देत आहेत. उद्या सायंकाळी ६ वा. प्रचार संपणार असून १८ तारखेला मतदान होणार आहे. 

केज, परळीत जंगी सभा
------------------------------
उद्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सकाळी ११ वा. केज शहरात मार्केट कमिटी मैदानावर तर दुपारी ३ वा. परळी शहरात राणी लक्ष्मीबाई टाॅवर येथे ना. पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. परळी येथे सभेच्या अगोदर दुपारी १ ते ३ वा. दरम्यान भाजप महायुतीच्या वतीने भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीला शिवाजी चौकातून सुरवात होणार असून बस स्थानक, एकमिनार चौक, स्टेशन रोड, भवानी नगर, आर्यसमाज मंदिर मार्गे रॅलीचे टाॅवर येथे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. रॅली व सभेस मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे  तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment