तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 April 2019

परळीचे वाटोळे करणा-या राष्ट्रवादीला मतदान करू नका - ना. पंकजाताई मुंडे
लेकीला पुन्हा संसदेत पाठविण्याचा परळीकरांचा निर्धार

गणेशपारच्या पारंपारिक सभेने झाली डाॅ. प्रितमताई मुंडेंच्या विजयाची सुरवात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०९ ----- कोट्यवधी रुपयांचा निधी आणून मी जिल्हयात जशी विकास कामे केली तशीच कामे मला परळीतही करायची होती, पण इथली नगरपरिषद आडवी आल्याने मला ती करता आली नाहीत. विकासात अडथळे आणून शहराचे वाटोळे करणा-या राष्ट्रवादीला या निवडणुकीत मतदान करून पश्चात्तापाचे धनी होवू नका असे कळकळीचे आवाहन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी गणेशपारच्या पारंपारिक सभेत बोलताना केले. दरम्यान, परळीच्या लेकीला पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने  संसदेत पाठविण्याचा निर्धार नागरिकांनी या सभेत केला.

  भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासपा व रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ना. पंकजाताई मुंडे यांची सोमवारी संध्याकाळी गणेशपार भागात परंपरेनुसार अभूतपूर्व सभा झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, रिपाइंचे नेते धम्मानंद मुंडे, दत्ताप्पा इटके, अशोक जैन, प्रकाश सामत, डाॅ. हरिश्च॔द्र वंगे, वहाजुद्दीन मुल्ला, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश विभूते, वैजनाथ जगतकर, बालासाहेब कराळे, राजा पांडे, प्रा. अतुल दुबे, रोहिदास बनसोडे, सतीश जगताप, केशव माळी, जितेंद्र मस्के, रमेश गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. 

  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सारखे मोठे नेते या परळीने देशाला दिले. इथल्या जनतेशी असलेला ॠणानुबंध त्यांच्या पश्चात आम्ही जपला. जनतेला चांगल्या नागरी सोयी सुविधा मिळाव्यात, शहराची सर्वांगिण प्रगती व्हावी हा आमचा सतत ध्यास असतो. मी राज्यात अनेक योजना आणल्या, जिल्हयात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, शाळा ही कामे केली,  पण इथली नगरपरिषद विकास कामे करण्यासाठी नाहरकत देत नसल्याने मला इच्छा असूनही मला काही करता आलं नाही. जागोजागी असलेला कचरा, घाणीचे साम्राज्य पाहून पालिकेच्या गलथान कारभाराबद्दल खंत वाटते. नगरपरिषद काम करू देणार नाही म्हणून शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी मी २५ कोटीचा निधी मंजूर करून आणला व सर्व प्रमुख रस्ते त्यात घेतले आता यातून चांगल्या दर्जाचे रस्ते होतील. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. चांगली कामे करून मला वैद्यनाथावर व इथल्या जनता जनार्दनावर विकासाचा अभिषेक करायचा आहे असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. 

परळी-पिंपळा रस्त्याचे दस-याला सीमोलंघन 
---------------------
परळी-पिंपळा रस्त्यावरून विरोधक राजकारण करत आहेत हे काम कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा मुळे रखडले आहे. काम वेळेत पुर्ण न झाल्यामुळे रहिवाशांना जो धुळीचा त्रास झाला तसाच तो मलाही झाला. काम अपूर्ण असल्याचं दुःख वाटते, जनतेला होणा-या वेदनांची मला जाणीव आहे परंतु हे काम लवकरच पूर्ण होईल. दस-याचे सीमोलंघन रहिवाशी याच नव्या रस्त्यावरून करतील असे त्या म्हणाल्या. 

'त्यांना' यासाठीच विरोधी पक्षनेते पद
---------------------------
माझ्यावर खोटे नाटे आरोप करण्यासाठीच राष्ट्रवादीने आमच्या भावाला विरोधी पक्षनेते पद दिले असल्याचा आरोप ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केला. मुंडे साहेब गेल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीने मुंडे कुटूंबातील  उमेदवार म्हणून स्वतःचा उमेदवार उभा केला नाही पण काॅग्रेसला पुढे केले, ही त्यांची दुटप्पी भूमिका जनता पुरती जाणून असल्याचे त्या म्हणाल्या. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता मग तुम्हाला पद दिले,  वडिलांना ज्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले त्यावेळी घराणेशाही नव्हती का? असा सवाल त्यांनी केला. दर दहा किमी वर भाषा बदलणारे जनतेचे काय भले करणार असेही त्या म्हणाल्या.  

लेक जाणार पुन्हा संसदेत
--------------------------------
प्रत्येक निवडणुकीत गणेशपार भागात सभा घेण्याची मुंडे साहेबांची परंपरा होती, इथली सभा भाजपला नेहमीच लकी ठरलेली आहे,  तीच परंपरा पुढे जपत ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतलेल्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोपीनाथ मुंडे हे नांव सर्व सामान्यांशी जोडले गेले आहे, त्यांच्या जागेवर दुसरा व्यक्ती कुणीच पाहू शकत नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रितमताईना मताधिक्य देण्यासाठी स्पर्धा सुरू आहे, परळीने देखील मताधिक्य देण्यासाठी मागे राहू नये  असे ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केलेल्या  आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी परळीची लेक असलेल्या डाॅ. प्रितमताई मुंडे यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविण्याचा निर्धार या सभेत केला.

असंख्य कार्यकर्ते भाजपात
-----------------------------
या सभेत काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.  ना. पंकजाताईंनी या सर्वांचे स्वागत केले. सर्वश्री दुल्हेपाशा, अविनाश जोशी, राजेंद्र इंगळे, अनिल मस्के, काळबा मस्के, वैजनाथ मस्के आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. सभेचे प्रास्ताविक आश्विन मोगरकर तर संचलन सचिन स्वामी यांनी केले. यावेळी सभेला या भागातील नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment