तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 29 May 2019

लोकनेत्याच्या अभिवादनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ जूनला गोपीनाथ गडावरगोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण तरूणांसाठी रोजगार मेळावा ; युतीच्या नवनिर्वाचित खासदारांचाही होणार सन्मान

ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. २९ ----- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पांचव्या स्मृतीदिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठवाड्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार येत्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वतीने यंदा विविध सामाजिक उपक्रमां बरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नवनिर्वाचित खासदारांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे. 

   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे उपस्थित राहणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंधारण मंत्री प्रा राम शिंदे,  मराठवाड्यातील भाजपा शिवसेना युतीचे सर्व नवनिर्वाचित खासदार तसेच जिल्हयातील सर्व आजी माजी आमदार, महत्वाची नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी  उपस्थित राहणार आहेत. 

  सुरवातीला सकाळी ११ वा. रामायणाचार्य ह.भ.प. ढोक महाराज यांचे सुश्राव्य किर्तन होणार असून दुपारी १ वा. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाड्यातील भाजपा शिवसेना महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचाही सत्कारही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार असून भाजपा महायुतीला बीडसह राज्यात घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे सर्व जनतेचे आभार मानणार आहेत. 

ग्रामीण तरूणांसाठी प्रतिष्ठान सरसावले
----------------------------
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. महा आरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, आत्महत्या झालेल्या शेतक-यांच्या कुटूंबियांना मदतीचा हात आदी उपक्रमा बरोबरच अलिकडेच सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून प्रतिष्ठानने दुष्काळग्रस्त भागातील पालकांना आधार देण्याचे काम केले. आता आर्थिक परिस्थिती मुळे व्यावसायिक शिक्षण व कोर्स पुर्ण करू न शकणा-या ग्रामीण भागातील तरूणांसाठी प्रतिष्ठानने  रोजगार मेळावा आयोजित करून मदतीचा हात पुढे केला आहे. या मेळाव्यातून किमान दहावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या बीड जिल्हयातील सुमारे पांच हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणा बरोबरच त्यांच्या आवडीचा कोर्स पुर्ण करण्यासाठी एखाद्या नामांकित कंपनीत मानधन तत्वावर जाॅब देऊन कोर्स पुर्ण केला जाणार आहे, त्यासाठी पुण्याची 'यशस्वी ' ही संस्था सहकार्य करणार आहे. कोर्स पुर्ण झाल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला चांगला रोजगार मिळू शकेल अशी व्यवस्था ना. पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. 

    येत्या ३ जून रोजी होणा-या कार्यक्रमास व मेळाव्यास सर्व नागरिक तसेच भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment