तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 28 June 2019

परळी पालिकेच्या अनागोंदी कारभाराचे आ. संगीता ठोंबरे यांनी सभागृहात काढले वाभाडे !


 नगरोत्थान योजनेच्या कामांची विभागीय आयुक्त केंद्रेकरांमार्फत चौकशी करू - नगर विकास राज्यमंत्र्यांचे उत्तर

मुंबई (प्रतिनिधी) :-  दि. २८ ----- परळी (जि.बीड) येथे शासनाच्या सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून झालेली बोगस व अर्धवट कामे, रखडलेली पाणी पुरवठा योजना, घाणीचे साम्राज्य या व अशा अनेक दाखल्यांसह पालिकेच्या अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत केजच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी आज सभागृहात लक्षवेधी मांडून सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, परळी शहरातील नगरोत्थान योजनेच्या कामांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी उत्तरात बोलतांना सांगितले. 

   परळी शहरात शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत रस्ते, नाल्या व इतर कामे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. ही कामे करताना पालिकेने कुठल्याही नियमाचे पालन केले नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून देखील ही कामे निकृष्ठ दर्जाची व अर्धवट स्थितीत झाली आहेत, याकडे आ. संगीता ठोंबरे यांनी आज सभागृहात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला. 

  शासनाने परळी शहरासाठी मंजूर केलेल्या ३५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम मार्च २०१९ पर्यंत पुर्ण होणे अपेक्षित होते. वास्तविक ही योजना २०१२ मध्येच मंजूर झाली होती व २०१४ अखेर पर्यंत ती पुर्ण होऊन रहिवाशांना पाणी मिळायला हवे होते पण अजूनही किरकोळ कामे, चाचणी अशी कारणे पुढे करून याचे काम रखडून ठेवले गेले असल्याने रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.  शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे, कच-याचे वर्गीकरण व योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरची कामे अर्धवट अवस्थेत असताना नवीन मलनिःस्सारण प्रकल्प टप्पा १ साठी १०१ कोटी ८६ लक्ष रूपये मंजूर केले गेले आहेत. या कामाच्या मंजूरीचा जीआर शासनाच्या  संकेतस्थळावर उपलब्ध नाही शिवाय  चढ्या दराने निविदा भरण्यात आल्या, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणी आ. ठोंबरे यांनी केली. 

  दरम्यान, या प्रश्नाची दखल घेत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी नगरोत्थान योजनेतील सर्व कामांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल व नंतरच पुढील कार्यवाही करू असे सांगितले. 

विरोध विकासाला नाही
मलिदा लाटण्याला..
---------------------------
नगरोत्थान योजनेची निकृष्ट व बोगस कामे झाली आहेत, तीच अवस्था पाणीपुरवठा योजनेची असून रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचा अनागोंदी कारभार पाहता नवीन प्रकल्पाचीही तीच गत होणार आहे. जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या विकासाला कधीच विरोध केला नाही उलट सहकार्याची भूमिका ठेवली आहे, त्यांचा विकासाला विरोध नसून मलिदा लाटण्याला आहे असे आ. संगीता ठोंबरे म्हणाल्या.

No comments:

Post a comment