तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 11 August 2019

मराठवाड्यासाठी खुशखबर;नाथसागरात 80 टक्के पाणी साठाप्रतिनिधी
जायकवाडी धरणात 11 व्या दिवशीही पाण्याचा ओघ सुरूच आहे. शनिवारी दिवसभर 31 हजार 627 क्युसेक्सने जलौघ दाखल झाल्याने जलाशयाची टक्केवारी 80 पर्यंत पोहोचली आहे. रात्री ऊशिरानंतर वरच्या प्रकल्पातून पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे पोहचला आहे. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 63,332 क्युसेकने आवक सुरू असून पाणीसाठी 80.17 टक्के झाला आहे. तर नाथसागरात 73,789 क्युसेकने आवक होत आहे.एकुण 1522 फूट जलसाठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पात 29 जूलैपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे 1492 फूटांपर्यंत घसरलेली पाणीपातळी 11 व्या दिवशी 1518.15फूट एवढी झाली आहे. पाणीसाठ्यात एकूण 26 फूटांनी वाढ झाली आहे. जायकवाडीच्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या विक्रमी गतीने पाणीपातळी वाढली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी आता केवळ 4 फूट पाणीपातळीची गरज आहे. 462.732 मी. असलेल्या या पाणीसाठ्यात सध्या प्रतिसेकंद 63,332 क्युसेक्स याप्रमाणे नवीन पाणी येतआहे. धरणात एकुण पाणीसाठा 2399.780 दशलक्ष घनमीटर एवढा असून वापरायोग्य (जिवंत पाणीसाठा) जलसाठा 1661.674 दशलक्ष घनमीटरआहे, अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी दिली. नांदुर मधमेश्वर व नागमठाण या धरणातून जलविसर्ग वाढवण्यात येणार असल्याने जायकवाडीच्या नियंत्रण कक्षातील यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे.जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून काल रात्री 9 पासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हा जलविसर्ग 400 क्युसेक्सवरुन दुपारी 3 वाजता 600 क्युसेक्स प्रतिसेकंद करण्यात आला आहे. रात्री यात पुन्हा वाढ करून 900 क्युसेक्स प्रतिसेकंद केला जाणार आहे. नाथसागरमधून माजलगाव धरणात एकुण 75 दशलक्ष घनमीटर (अडीचटीएमसी) एवढे पाणी देण्याबाबत जलसंपदा मंत्रालयातून सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार हे पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण उपविभागाचे स्थापत्य अभियंता राजाराम गायकवाड यांनी दिली.

गंगथडी भागात पाणी सोडण्यात येणार -

आमदार संदिपान भुमरे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची भेट घेतली व जायकवाडी धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली. जायकवाडीच्या जलविद्युत प्रकल्पातून (हैड्रो) पाणी सोडावे. जेणेकरून टंचाई व दुष्काळी तडाख्यात सापडलेल्या ‘गंगथडी’ भागातील 18 गावांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर आमदार संदिपान भुमरे व तहसीलदार महेश सावंत यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या भिंतीवर असलेल्या धरण नियंत्रण कक्षात जाऊन पाणीस्थितीचा आढावा घेतला. धरणाचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी आमदार भुमरे यांना पाण्याची आवक, वरच्या धरणांचा जलविसर्ग, पर्जन्यमान वसंभाव्य पाणीवाढ याबाबतची माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार महेश सावंत यांनी जिल्हाप्रशासनाला याबाबतची माहिती देऊन पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. धरणातील पाण्याची आवक वाढल्याने 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जायकवाडीच्या ‘हैड्रो’ मधून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.आमदार संदिपान भुमरे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार महेश सावंत यांनी पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी यंत्रणेला आदेश दिले आहेत. ‘गंगथडी’ भागातील सर्व 18 गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये, पात्रात असलेली अतिक्रमणे काढून घ्यावी, जनावरांना नदीपात्राजवळ बांधून ठेऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
(संग्रहित फोटो)

No comments:

Post a comment