तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

परळीच्या पाणी प्रश्नांवर ना. पंकजाताई मुंडे यांनी घेतली महत्वाची भूमिका

जायकवाडीचे पाणी तातडीने खडका बंधा-यात सोडण्यासाठी हालचाल ;  वाॅटरग्रीडही लागू करणार

नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे थाटात लोकार्पण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १३ ----- जायकवाडी धरणातील पाणी तातडीने खडका बंधा-यात सोडण्यासाठी शासन स्तरावर आपण हालचाली सुरू केल्या आहेत तथापि, भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी जायकवाडीचे पाणी 'लिफ्ट' पध्दतीने वाण धरणांत सोडण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत असल्याचे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. मराठवाड्यात होत असलेल्या वाॅटरग्रीड चा फायदा या भागालाही मिळवून देऊ असे त्या म्हणाल्या. 

     राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत २ कोटी ५० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या नागापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात, आरोग्य उप संचालक डाॅ एकनाथ माले, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, जि.प. समाजकल्याण सभापती संतोष हंगे, ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, भीमराव मुंडे, सुधाकर पौळ, रमेश कराड, दिनकरराव मुंडे, नितीन ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ लक्ष्मण मोरे आदी यावेळी उपस्थित होते. 

   पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, या भागात अत्यल्प पाऊस झाल्याने वाण धरण अद्यापही कोरडेच आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्या बरोबरच सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या खडका बंधारा उपयोगाचा आहे त्यामुळे तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जायकवाडीचे पाणी माजलगांव धरणात व तिथून खडका बंधा-यात सोडण्यात येईल. या शिवाय भविष्यात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी  वाण व पोहनेर नदीवर बॅरेजेस बांधणे तसेच  जायकवाडीचे पाणी लिफ्ट पध्दतीने वाण धरणांत सोडण्याचा आपला प्रयत्न आहे, हा भाग वाॅटरग्रीड प्रकल्पात समाविष्ट करू, यातील सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबींवर तोडगा काढू असे त्या म्हणाल्या.

*विकासाबरोबर माणसंही जोडली* 
-----------------------------
राजकारणात काम करत असताना रस्ते, नाल्या, इमारती बांधण्याबरोबरच सर्व सामान्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ देऊन माणसं जोडण्याचे काम आपण केले. आज ग्रामीण भागात शंभर टक्के शौचालय झाली, आयुष्यान भारत, उज्ज्वला गॅस, सौभाग्य योजना, घरकुल आदी योजनांचा गोरगरीबांना लाभ दिला. जिल्हयात एकेकाळी स्त्री जन्मदर चिंताजनक बनला होता, परंतु यावर मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने आज एक हजार मुलांमागे ९३७ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. आरोग्य, पोषण आणि सिंचनासाठी केंद्र व राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. 

*भेदभाव न करता विकास*
---------------------------
या भागातील सर्व सामान्य जनतेने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर अतोनात प्रेम केले आहे, त्यांना विकासाच्या योजना देऊन त्यांच्या ऋणात मी जन्मभर राहणार आहे. परळी मतदारसंघाचा विकास करताना ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे, हे मी बघितले नाही. जात, धर्म, पंथ, पक्ष बाजूला ठेवून केवळ सामान्य माणसाच्या हितासाठी प्रत्येक गावांत भरभरून निधी दिला असल्याचे सांगत ना. पंकजाताई मुंडे यांनी नागापूरला आतापर्यंत १६ कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले. 

  कार्यक्रमाच्या सुरवातीला धन्वंतरी व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी   नागापूरचे  उप सरपंच शिवराज मुंडे, संतोष सोळंके, सुनील सोळंके, श्रीमंत सोळंके, कुंडलिक सोळंके, दगडू मुंडे, बालासाहेब मिसाळ आदी ग्रामस्थांनी सत्कार टाळून ना. पंकजाताई मुंडे यांचे वृक्षाचे रोपटे देवून स्वागत केले तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पांच हजाराचा धनादेश दिला.  वाॅटरकप स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या सरफराजपूर येथील ग्रामस्थांचा सत्कार तसेच आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डाचे वाटप त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.  

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ अशोक थोरात यांनी केले तर सचिन सोळंके यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, परिचारिका, वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment