तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू मूर्तिकारांचा मूर्तीवर शेवटचा हात मारण्यास सुरुवात


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया जयजयकार करत गणपतीचे आगमन आता काही दिवसावर येऊन ठेपले आहे. बाजारात आता सजावटीसाठी साहित्य भरपूर प्रमाणात आले आहे काही दिवसांवर श्री गणरायाचे आगमन आले असून भाविकांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कारखान्यांमध्ये मूर्तीकार, कारागीरांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. बाप्पा भाविकांच्या घरा-घरात व मंडपात जाण्यास सज्ज झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महागाईची झळ वाढली असून मूर्तीच्या किंमतीत वाढ झाल्याचे मुंबईतील मूर्तीकार  श्री सिद्धिविनायक चित्र शाळेचे विक्रांत पांढरे यांनी सांगितले. 
तीनमहिन्यांपासून मूर्ती कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तींची कामे सुरू होतात. श्री गणरायांच्या आगमनाचे ‘काउंटडाऊन’ आता सुरू झाले असून काही दिवसानंतर बाप्पा घरा-घरात विराजमान होणार आहेत. मूर्तीचे प्राथमिक रंगकाम दोन महिन्यांत पूर्ण झाले आहे. आता सर्वच मूर्तीवरील सोन्याचे दागिने रंगवणे, फिनिशिंग वर्क करणे, पाटावर गणपती बसवणे, पुन्हा एकदा मूर्तीवर हात फिरवणे वगैरे कामे सुरू आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती नेण्यास सुरूवात झाली आहे. मोठ्या मूर्ती असल्याने मंडळांचे कार्यकर्ते आधीच मूर्ती नेऊन मंडपात ठेवत आहेत. 
महागाईची झळ 
गेले चार-पाच वर्ष महागाईचा आलेख चढता असून गणपती बाप्पाही त्यातून सुटलेले नाहीत. मूर्तीचे दर दरवर्षी वाढत आहेत. मुंबईत पेण,पनवेल येथून बिन रंगवलेल्या मूर्ती येतात व त्या रंगकाम करून मूर्तीकार विकतात. पेणहून मूर्ती आणणे, ट्रान्सपोर्टेशन, कच्चा माल, रंग, कारागीरांचा खर्च वाढला आहे. या सर्वांमुळे मूर्तीच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातही गणपतीला रंगकाम करणारे कारागीर मिळणे अवघड झाल्याने मोठ्या कारखान्यांमध्ये ओढाताण होत आहेत.. सध्या गणपती मूर्ती कारखाने दिवस-रात्र सुरू असून बाप्पांच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे. यंदाही लालबागचा राजा, श्री सिद्धिविनायक, दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमांना सर्वाधिक मागणी आहे. विविध आकारातील लालबागच्या राजाच्या प्रतिकृतींना सर्वाधिक मागणी आहे. महागाई वाढत असून किमान छोटी सव्वाफूट मूर्ती घ्यायची झाली तरी१००० ते २००० रूपये मोजावे लागत आहेत. 
घरगुती गणपती वाढताहेत 
दरवर्षी घरगुती गणपतींच्या मूर्तींची संख्या वाढत असून घरा-घरात गणपती बसविणारे भाविक वाढत असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. भाविक श्रद्धेने मूर्ती घेत असतानाच अधिकाधिक चिकित्सक बनले आहेत. मूर्तीवरील धोतर, शाल यांना चमकी, जरी लावण्याची मागणी भाविक करतात. ‘लाईट इफेक्ट’मध्ये मूर्तीवरील ही जरी चमकते. भाविक चिकित्सक बनले असून आपापला बाप्पा अधिकाधिक कसा आकर्षक दिसेल याकडे सर्वच भाविक लक्ष पुरवत आहेत. अशा भक्तांची संख्या वाढल्याने मूर्तीकारांचाही कस लागत आहे. भाविकांची आणि मूर्तीकारांची तयारी पूर्ण झाली असून आता प्रत्येक जण बाप्पाच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आह.

No comments:

Post a comment