तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

परळीतील शिवाजी नगर, किर्तीनगर भागात विशेष रस्ता अनुदानातील अंतर्गत रस्ता कामांचे थाटात लोकार्पण
आम्ही जनतेसाठी काम करत राहू ; तुम्ही आयुष्यभर विरोधात मोर्चेच काढा - ना. पंकजाताई मुंडे यांचा राष्ट्रवादीला टोला  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १३ ----- जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो, त्या अनुषंगाने    सरकारही निर्णय घेते पण निर्णय होणार असे दिसताच राष्ट्रवादीचे नेते मोर्चे काढतात व निर्णय जाहीर झाला की, आमच्यामुळेच झाले असे पत्रक काढतात, त्यांचा हा प्रकार जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळ फेक करणारा आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज राष्ट्रवादीच्या शहरातील मोर्चाचा समाचार घेतला. 

   विशेष रस्ता अनुदानातील ६० लक्ष रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या  शहरातील शिवाजी नगर व किर्तीनगर भागातील अंतर्गत रस्ता कामांचे लोकार्पण पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, शेख अब्दुल करीम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आदी उपस्थित होते. 

   केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जन सामान्यांसाठी विविध योजना आम्ही आणल्या व त्याचा लाभही आमच्याच कार्यकाळात आम्ही मिळवून दिला, विकास कामाला देखील आम्हीच निधी आणला व काम देखील पुर्ण केले. आयुष्मान भारत योजना, उज्ज्वला गॅस, शौचालय, घरकुल आदी योजना ही त्याची उदाहरणे आहेत.अशी वस्तुस्थिती असतांना राष्ट्रवादीचे नेते मात्र आम्ही केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय लाटून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी परळीत ज्या मागण्या घेऊन मोर्चा काढला, त्या मागण्या पुर्ण होणारच होत्या, सरकार दरबारी त्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो, परंतु राष्ट्रवादीचे नेते एखादा निर्णय होणार असल्याचे दिसताच त्यावर मोर्चा काढतात व नंतर त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात, त्यांची ही कृती म्हणजे जनतेच्या डोळ्यात निव्वळ धुळ फेक आहे, आम्ही जनतेच्या हिताचे  निर्णय घेत राहू,  तुम्ही आयुष्यभर मोर्चे काढा आणि विरोधातच रहा असा टोला ना. पंकजाताई मुंडे यांनी लगावला. 

नगरपरिषदेचे अपयश
---------------------------
परळी नगरपरिषदेतील सत्ताधा-यांचे    जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष असून  पालिका जनतेला पाणी देखील देवू शकत नाही, त्यांच्याच गलथान कारभारामुळे खडका बंधा-यातून नागरिकांना पाणी  मिळू शकले नाही, पण यासाठी आपण प्रयत्न केल्याने पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.  साध्या नागरी समस्या सोडविण्यासाठी देखील नगरपरिषदेकडे पैसा नाही, शहराची एवढी वाईट अवस्था राष्ट्रवादीमुळे झाली आहे असे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. नगरपालिका अपयशी ठरल्यामुळे आपण पांच कोटी रूपये मंजूर करून रस्ते केले, याशिवाय आणखी २५ कोटी रूपये मंजूर करून घेतले आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचा १३३ आराखडा मंजूर केला असून शहराचा विकासात्मक कायापालट करण्याचा आगामी काळात आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आपल्या भाषणात मागेल त्याला बोअर देण्याची योजना राबवून परळीत पाणी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. परळीचा विकास फक्त ना. पंकजाताई मुंडे हयाच करू शकतात त्यामुळे तुमचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम ठेवा असे आवाहन केले. 

   कार्यक्रमास अशोक भातांब्रेकर,  नगरसेवक पवन मुंडे, दत्ता कुलकर्णी, रविंद्र परदेशी, सुधाकर पौळ, प्रल्हाद सुरवसे, दत्ता देशमुख, भिमा पौळे, अॅड. दत्तात्रय आंधळे, अंजली माळी, राजेंद्र ओझा, श्रीपाद शिंदे, श्रीनिवास राऊत आदींसह असंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ज्ञानोबा सुरवसे, सुनील कांबळे यांनी केले.

No comments:

Post a comment