तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 7 August 2019

सावता माळी परिसर, खुदबेनगर भागात रस्त्याचे लोकार्पण तर बाजीप्रभू नगरात सभागृहाचे भूमिपूजन
तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी तुम्हाला विकास देते- ना. पंकजाताई मुंडे यांची परळीकरांना साद

परळीत आणखी २० कोटीचे अंतर्गत रस्ते; तीर्थक्षेत्र विकासातून चेहरा मोहरा बदलणार!

परळी  वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. ०५ ----- केंद्र व राज्याप्रमाणे  इथल्या नगरपालिकेत भाजपची सत्ता असती तर परळी शहर आदर्श झाले असते, तरीही सत्तेच्या माध्यमातून १३३ कोटीचा तीर्थक्षेत्र आराखडा, अंतर्गत रस्त्याची कामे मंजूर करून ती पुर्ण केली, आणखी २० कोटीची कामे होणार आहेत,  तुम्ही मला आशीर्वाद द्या, मी तुम्हाला विकास देते अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी परळीकरांना साद घातली. दरम्यान, केवळ कागदावर विकास सांगणा-या राष्ट्रवादीला माझ्या कामामुळे धडकी भरली असून जनतेला फसवून विश्वास जिंकता येत नाही असा टोला त्यांनी लगावला.

    पांच कोटी विशेष रस्ता अनुदानातून   खुदबेनगर व सावता माळी परिसरात पूर्ण झालेल्या ३० लाख रुपयांच्या अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण व बाजीप्रभू नगरात आमदार निधीतून दहा लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या हनुमान मंदिराच्या सभागृहाचे भूमिपूजन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाले त्यावेळी विविध ठिकाणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, नगरसेवक पवन मुंडे, नगरसेविका उमाताई समशेट्टे, सुधाकर पौळ, शिवसेनेचे वैजनाथ सोळंके,  शेख अब्दुल करीम, धम्मानंद मुंडे, केशव माळी, बालासाहेब कराळे, उमेश खाडे, ताजखान, अनीस कुरेशी, खालेदराज,रोहिदास बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.

   इथली नगरपालिका आमच्या ताब्यात नसली तरी लोकनेते मुंडे साहेबांवर या भागातील जनतेने जीवापाड प्रेम केले आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द आहे व राहील. वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा १३३ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला, यातून आगामी काळात शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पांच कोटीचे अंतर्गत रस्ते केले, आणखी २० कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे, त्याचे निविदास्तरावर आहे, लवकरच यातून उर्वरित रस्तेही होतील. पांच कोटी पैकी तब्बल दीड कोटीचे रस्ते आम्ही मुस्लिम वस्तीत केले आहेत असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या.

   केवळ रस्ते बांधून आम्ही थांबलो नाहीत तर समाजातील शेवटच्या घटकांचा विकास व्हावा यासाठी महिला बचतगट, उज्ज्वला गॅस, आयुष्यान आरोग्य कार्ड, कामगारांना योजना, घरकुलं दिली आहेत.
आमचे धोरण सब का साथ सबका विकास असे आहे,मला तुमच्याकडून कांहीही नको, फक्त आशीर्वाद द्या, मी तुम्हाला विकास देते असे त्या म्हणाल्या.

माझ्या कामांमुळे विरोधकांना धडकी

माझे काम जनतेला शाश्वत विकास देणारे आहे.  विरोधकांनी रस्ते कागदावर केले तर आम्ही प्रत्यक्षात केले, हा आमचा आणि त्यांच्यातील फरक आहे. मी केलेले काम जनतेला दिसत आहे, त्यामुळे त्यांना धडकी भरली आहे. आम्ही निधी जाहीर केला की ते रात्रीतून उदघाटन करतात. परंतु फसवा फसवी करून जनतेचा विश्वास जिंकता येणार नाही असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

अन् पंकजाताईंनी भाषण थांबवले

खुदबेनगर भागात भाषण सुरू असताना मस्जिद मधून मुस्लिम बांधवांची प्रार्थना (अजान) सुरू झाली, त्यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी आपले भाषण मध्येच थांबवले. प्रार्थना संपल्यानंतर त्यांनी आपले भाषण पुर्ण केले, त्यांनी दाखवलेला मुस्लिम धर्माबद्दलचा आदर पाहून उपस्थित बांधव व महिला भारावून गेल्या.

No comments:

Post a comment