तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 14 August 2019

तब्बल ५३ वर्षांनी एकत्र आलेले वर्गमित्र समाधीस्थळी झाले नतमस्तक!
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणीने आले गहिवरून

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले सर्वांचे आदरातिथ्य

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १४.....
        मैत्री हा शब्दच सर्वांना प्रेरणा देणारा ... ती जेवढी जुनी तेवढी घट्ट... त्यातही दहावीचे मित्र म्हणजे जिवश्च कंठश्च... हे मित्र तब्बल ५३ वर्षांनी एकत्र आले तर त्यांच्या भावनांचा कल्लोळ नाही झाला तर नवलच... त्यातही सर्वांना सोबत घेऊन जाणारा जिवाभावाचा मित्र आपल्यातून अनपेक्षितपणे निघून गेला असेल आणि त्याच्याच समाधीजवळ सगळे एकत्र आले तर भावनांचा बंध सुटणारच आणि झालेही तसेच. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे वर्गमित्र आज एकत्र आले आणि साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होताच सर्वांच्या आश्रुंचा बांध फुटला... सर्वांना साहेबांच्या आठवणीने गहिवरून आले. साहेबांविषयी सर्वजण अगदी भरभरून बोलत होते. वडीलांच्या वर्गमित्रांचे राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आदरातिथ्य करून त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या.
       याचे झाले असे की, परळी वैजनाथच्या जिल्हा परिषद शाळेतील १९६५-६६ बॅचच्या दहावीच्या वर्गमित्रांनी गेट टुगेदर करण्याचे ठरविले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हेही याच बॅचचे. सर्व वर्गमित्रांनी एकत्र यावे यासाठी साहेबांनी बरेच प्रयत्न केले पण योग जुळून आला तो ते हयात नसताना... पुणे, मुंबई, औरंगाबाद, हैद्राबाद अशा विविध ठिकाणी स्थायिक झालेले हे सर्व वर्गमित्र आज बुधवारी (दि. १४ आॅगस्ट) एकत्र आले. शहरातील भागवत पॅलेस येथुन सर्वजण आपला वर्गमित्र आणि राज्यच नव्हे तर देशपातळीवर नावलौकिक मिळवलेले लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या समाधीस्थळी म्हणजेच गोपीनाथ गड येथे आले. साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतांना सर्वांना भावना अनावर झाल्या, कुणालाही आपले आश्रु आवरता आले नाहीत. सर्वांच्या भावनांचा बांध फुटला. साहेबांच्या आठवणींचा अक्षरशः महापुर आला. प्रत्येकजण आपापल्या भावना व्यक्त करताना थकत नव्हता. मैत्री एवढी जुनी असली तरी तीची विण घट्ट असल्याचे जाणवत होते. सर्वांनी साहेबांच्या पुतळ्याची आणि परिसराची पाहणी केली.
       गोपीनाथ म्हणजे आमच्या सर्वांच्या गळ्यातील ताईत... तो वर्गात असला म्हणजे वातावरण प्रसन्न आणि टवटवीत राहणारच... सर्वांशी मिळुन मिसळून राहुन, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धाऊन जाण्याच्या स्वभामुळेच तो सर्वमान्य नेता झाला, तो आमच्यात नाही असे कधी वाटलेच नाही अशी भावना यावेळी प्रकाशसिंग ठाकूर यांनी व्यक्त केली. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मैत्री मेळ्याला नंदकुमार जोशी (मुंबई), विनायक पिंगळे (मुंबई), सुभाष दगडगुंडे, शाम दंडे, जनार्दन जगतकर (सर्व रा. औरंगाबाद), अब्दुल लतीफ (अंबाजोगाई), सुभाष कदम (लातूर), जयंत जोशी, वल्लभ पंछी, अरूण कुलकर्णी, (सर्व रा. पुणे), सुरेश तोताडे, श्रीनिवास टेळकीकर (नांदेड) यांच्यासह परळीतील दिनकर मुंडे गुरूजी, ओमप्रकाश भूतडा, रामप्रसाद मोदानी, पांडुरंग मोदानी, रामदास रामदासी, मुकुंद चुंबळकर, रंगनाथ खकेसर, उत्तम जोशी, नारायण देशमुख, शेख पाशासर, मधुकर आडसुळे, प्रकाशसिंग ठाकूर, विठ्ठल आदोडे, मारुती मुंडे गुरूजी, सुभाष नवाडे आदींनी आवर्जून उपस्थिती लावली. एकमेकांना भेटुन सर्व आनंदी झाले होते.

ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आदरातिथ्य

       लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या वर्गमित्रांनी त्यांची कर्तृत्ववान कन्या आणि ज्यांनी वडिलांचा वारसा खंबीरपणे चालवणार्‍या राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे आदरातिथ्य करून स्वागत केले आणि सर्वांशी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी सर्वांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

No comments:

Post a comment