तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 September 2019

जे.जे. रुग्णालयाने 27 ऑगस्ट पासून सुरु केलेल्या महा अवयवदान अभियान – 2019 ची सांगता महारॅलीने करण्यात आली अवयवदानाच्या जनजागृतीसाठी महा रॅलीचा महा जनसागर



बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई, : ‘चला आजच शपथ घेऊ या, अवयवदाता बनू या’ अशी शपथ घेत जे.जे. रुग्णालयाने 27 ऑगस्ट पासून सुरु केलेल्या महा अवयवदान अभियान – 2019 ची सांगता महारॅलीने करण्यात आली. जे.जे. रुग्णालयाने अवयवदानाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी मरीन ड्राइव्ह वर एअर इंडिया बिल्डिंग पासून ते जे.जे. जिमखानापर्यंत रॅलीचे आयोजन केले होते. ह्या रॅलीत जे.जे. रुग्णालयातील सर्व आरोग्य शाखेचे विद्यार्थी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते तसेच ह्या रॅलीत मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयाच्या व शाळेच्या विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग नोंदविला. जवळपास 30 महाविद्यालयाचे व शाळेचे विद्यार्थी मिळून जवळपास 3 हजार पेक्षा जास्त एवढ्या संख्येचा एक जनसागर अवयवदानाच्या चळवळीसाठी एकत्र आला होता.
आजही समाजात नेत्र, किडनी, हृदय, यकृत, फुफ्फुसे अशा व इतर अनेक अवयवांच्या प्रतिक्षेत लाखो रुग्ण खितपत पडले आहेत. वेळेवर हवा असलेला अवयव मिळाल्यास कित्येक लोकांना पुनर्जन्म मिळू शकतो, कित्येक दुर्धर आजार बरे केले जाऊ शकतात. हाच संदेश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले ह्यांनी सांगितले. पोलीस व अग्निशमन दलाच्या चोख बंदोबस्तात ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ह्या रॅलीत अनेक पोस्टर्स तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश लोकांसमोर मांडला.
रॅलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या ‘देहदान श्रेष्ठदान’ ह्या घोषणेने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. त्यामुळे मरिन ड्राइव्हवर फिरायला आलेल्या लोकांनीही ह्या रॅलीत सहभाग घेतला. रॅलीच्या नंतर जे.जे. जिमखान्यात ज्या ज्या लोकांच्या सहकार्यामुळे व सहभागामुळे ही रॅली यशस्वी पार पडली अशा लोकांचा व संस्थांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व नंतर अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. रॅलीनंतर जवळपास अनेकांनी अवयवदानासाठी आपले नाव नोंदवले. ह्या रॅलीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रायल देशाच्या दूतावासाचे प्रतिनिधी याकोव्ह फ्राइन्स्टाईन उपस्थित हेाते तर डॉ.तात्याराव लहाने, संचालक, डीएमईआर, प्रभात रहांगदळे (अग्निशमन दलाचे संचालक), श्री.विजयकुमार अतिरिक्त पोलीस आयुक्त, डीसीपी निशानदार हे देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment