तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 17 September 2019

रवीचंद्रन आश्वीनच्या कारकिर्दीला ग्रहण लागले ?               नुकत्याच संपलेल्या विंडीज दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या दोन्ही कसोटी सामन्यात भारताचा अव्वल दर्जाचा फिरकी गोलंदाज व उपयुक्त फलंदाज रवीचंद्रन आश्विनला डावलण्यात आले. यावर अनेक जुन्या खेळाडूंनी व क्रिकेट पंडितांनी आश्चर्य व्यक्त केले. वास्तविक आश्वीन संघात हवा होता परंतु संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर दाखविलेला अविश्वास त्याच्या कारकिर्दीला ग्रहण लागल्याचे संकेत तर देत नाही ना ?

                   थोडीसी फसवी व फलंदाजांना गोंधळात टाकणारी गोलंदाजीची अॅक्शन असलेला आश्वीन सन २०१० च्या आयपीएल सत्रात हरभजन सिंग, मुथय्या मुरलीधरन, डॅनिएल व्हेटोरीसारख्या प्रस्थापित व पियुष चावलासारख्या उभरत्या गोलंदाजांच्या भाऊगर्दीतून वाट काढत यशस्वी ठरला. इतकेच नाही तर त्या आयपीएल सत्राचा हिरोच बनला !

                   आयपीएलची खोज असलेला आश्विन सन २०१०-११ च्या  श्रीलंका दौऱ्यासाठी निवडला गेला. परंतु तेथे तो प्रवासीच राहिला. त्यानंतरच्या झिंबाब्वे दौऱ्यात वनडे पदार्पण केले. पदार्पणात त्याला दोनच बळी मिळाले हे जरी खरे असले तरी त्याच्यातील गुणवत्ता निवड समितीला समजली व सन २०११ च्या भारतात झालेल्या विश्वचषकासाठी तो भारतीय संघात निवडला गेला.

                   सन २०११ चा विश्वकप भारताने जिंकला. त्यानंतरच्या इंग्लंड दौऱ्यात भारताला मालिका गमवावी लागली. भारताचा हुकमी एक्का अनिल कुंबळेचा वारसदार शोधण्याचे काम चालूच होते, त्यातच हरभजसिंगच्या फिरकीची जादूही ओसरल्यासारखे वाटत होते. त्याच शोध मोहीमेच्या टप्प्यात भारत असताना विंडीज संघ सन २०११ च्या उत्तरार्धात भारत दौऱ्यावर येणार होता. विंडीजविरुद्ध आश्विनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. मग आश्वीननेही त्या संधीचे अक्षरशः सोने केले. दिल्लीच्या तत्कालीन फिरोजशहा कोटलावर आपल्या पहिल्याच सामन्यात आश्वीनने नऊ बळी टिपून सामनावीर पुरस्कारही पटकविला.

                 आश्विनने इंजिनियरींगची पदवी घेतली, परंतु तो म्हणतो की इंजिनियरींगपेक्षा क्रिकेट सोपे आहे. उच्य कोटीची स्मरणशक्ती लाभलेला आश्विन आजपर्यंत ६५ कसोटी खेळला असून त्यामध्ये ३४२ बळी चटकावले आहेत. या दरम्यान २६ डावात ५ किंवा अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला तर सामन्यात १० किंवा अधिक बळी घेण्याचा कारनामा त्याने सात वेळा केला.

                कसोटीत ५०, १००, १५०, २००,२५०, ३०० बळी सर्वात जलद घेणारा आश्वीन भारताचा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. इतकेच नाहीतर फलंदाजीतही आश्वीनने कसोटीत ९३ डावात चार शतके व ११ अर्धशतकांसह २३६१ धावा काढल्या आहेत. एक दिवशीय सामन्यातही एका अर्धशतकासह ६७५ धावा भारतासाठी जमविल्या आहेत.

                कसोटीमध्ये सर्वाधीक सहा वेळा मालिकावीराचा पुरस्कार त्याला मिळाला असून सचिन तेंडुलकर व विरेंद्र सेहवाग प्रत्येकी ५ वेळा मालिकावीर ठरले असून आश्वीनने या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. सन २०१६ मध्ये आश्वीनला आयसीसीने " क्रिकेटर ऑफ दि ईयर " व " टेस्ट प्लेअर ऑफ दि ईयर " या सन्मानाने गौरविले आहे.

               सन २०१९ च्या आयपीएल सत्रात त्याने पंजाबकडून खेळताना राजस्थानच्या जोस बटरला नियमाप्रमाणे मांकडींग विकेट ( धावबाद ) केले. तो मुद्दा बराच गाजला परंतु ते सर्व काही नियमांच्या चौकटीत असल्याने आश्वीन बचावला.

              आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होऊ घातलेल्या कसोटी मालिकेत आश्वीनची १५ जणांच्या संघात वर्णी लागली आहे. परंतु त्याला संधी मिळते का नाही हा जर तरचाच प्रश्न आहे. जरी आश्विनला संधी मिळाली नाही तरी आश्वीनची कारकिर्द लगेच संपणार नाही. परंतु त्याच्या निवडीचे जे राजकारण खेळले जात आहे. ते बघता त्याच्या कारकिर्दीला ग्रहण लागल्याचेच ते द्योतक आहे.

                   भारताला कसोटीत विश्वविजेता बनविण्यात अग्रस्थानावर आश्वीनच आहे हे त्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतेच परंतु त्याला संपविण्याचे षडयंत्रही रचले जात असल्याचे लपत नाही. अशा हरहुन्नरी खेळाडूला बळ देण्याची गरज असताना त्याच्या कारकिर्दीशी जे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे ते खरोखर निंदनीय असून भारतीय संघाला आश्विन सारख्या लढाऊ खेळाडूचीच खरी गरज आहे. तूर्तास आपण सर्वजण त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देऊयात !!!

     लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२८२.

No comments:

Post a comment