तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

भारतीय वेगवान माऱ्याचा दिशादर्शक - जवागल श्रीनाथ                 जवागल श्रीनाथ हे सध्या क्रिकेटच्या मैदानात गाजत नसले तरी ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी ) मॅच रेफ्री पदावर सध्या कार्यरत आहेत. एकेकाळी ते भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा होते. सन २००३ च्या विश्वचषकापूर्वीच त्यांनी सक्रिय क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली होती. परंतु तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीच्या आग्रहाखातर श्रीनाथने सन २००३च्या विश्वचषकात खेळण्याचे मान्य केले. श्रीनाथ निव्वळ खेळलेच नाही तर आपल्या तेजतर्रार गोलंदाजीच्या बळावर

भारताला अंतिम  फेरी गाठून दिली. इतकेच नाही तर झहीर खानसह आशिष नेहराव देवाशिष मोहंतीसारख्या नवख्या गोलंदाजांना प्रोत्साहन देण्याचे काम केले.

                 ३१ ऑगष्ट १९६९ रोजी कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे जन्मलेल्या जवागल श्रीनाथ यांनी आपला ५० वा जन्मदिन नुकताच साजरा केला. चेंडू फळीच्या या खेळाची जवागलला लहानपणापासूनच आवड होती. मारी मलप्पा हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेला जवागल इंजिनियरींगची पदवी घेतली तरी क्रिकेटला चिटकून राहिला. या खेळाप्रती असलेली निष्ठा व आत्मीयता श्रीनाथला भारताच्या राष्ट्रीय संघात घेवून गेली. ताडमाड उंची लाभलेला श्रीनाथ तत्कालीन निवड समिती सदस्य व माजी कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या दृष्टीस पडला व पुढे त्याचे भाग्यच उजळले.

                  आय टी इंजिनियर असलेल्या  जवागल श्रीनाथ सन १९८९- ९० मध्ये आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीचा श्रीगणेशा करताना कर्नाकट कडून खेळताना आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच हैद्राबाद विरुद्ध हॅट्रीक घेऊन सनसनाटी आगमन केले. रणजी स्पर्धेत पदार्पणातच हॅट्रीक घेणारा तो केवळ तिसराच भारतीय गोलंदाज बनला होता. पदार्पणाच्या पहिल्याच सत्रात ६ सामन्यात २५ बळी घेत त्याने सर्वांनाच प्रभावित केले. पुढल्या सत्रातही २० बळी घेत तो प्रभावी ठरला. पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्राविरुद्ध घातक मारा करताना ९३ धावात ७ फलंदाज तंबूत पिटाळताना कर्नाटकला विजयी केले.                

                  दोन वर्षांच्या खडतर परिश्रमाचे फळ श्रीनाथला लगेच मिळाले. १८ ऑक्टोबर १९९१ रोजी पाकिस्तान विरूध्द एकदिवसीय सामना खेळून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली, तर पुढच्याच महिन्यात ऑस्ट्रेडियाविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यावेळी कपिलदेव भारतीय जलदगती माऱ्याचा सुत्रधार होता.

                सन १९९४-९५ च्या सत्रात कपिळदेवने निवृत्ती घेतल्या नंतर श्रीनाथच भारतीय आक्रमणाचा सुत्रधार बनला. त्यानंतर त्याने वेंकटेश प्रसाद, अजित आगरकर यांच्या मदतीने भारताच्या वेगवान गोलंदाजीचा नवा अध्याय सुरू केला. गोलंदाजीबरोबरच श्रीनाथने फलंदाजीतही भारतासाठी अनेकदा उपयुक्त डावही खेळले आहेत.

                सन १९९६ च्या टायटन कप तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूध्द स्वतःच्या गृह मैदान बंगलोर मध्ये अनिल कुंबळेच्या साथीने एक अशक्यप्राय विजय भारताला मिळवून दिला होता तो आजही अनेकांचा स्मरणात आहे.

                श्रीनाथ एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २००, २५०, व ३०० बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. तत्कालीन क्रिकेटमध्ये बलाढय फलंदाजी असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्द २४.४८ च्या सरासरीने ६० बळी ही कामगिरी श्रीनाथचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यात पुरेशी आहे. श्रीनाथने ६७ कसोटीत २३६ तर २२९ वनडेत ३१५ बळी घेत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ५४४ बळी घेतले. त्या कालखंडात टि-२० क्रिकेट खेळले जात नव्हते. नाहीतर श्रीनाथची गोलंदाजी त्या प्रारूपातही नक्कीच प्रभावी ठरली असती यावर कुणाचेच दुमत नसेल. अश्या या हरहुन्नरी व्यक्तीमत्वास  पन्नासाव्या जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा !


लेखक : -

दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

मोबाईल : - ९०९६३७२०८२
             

No comments:

Post a Comment