तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 1 September 2019

विद्यार्थ्यांची प्रतिभा जोपासून तिचा राष्ट्रनिर्माणासाठी उपयोग करून घेतला पाहिजे-श्री काशी जगद्गुरू


काशीपीठाकडून विद्यार्थ्यांसाठी अठरा लक्ष रुपयांचा सहायता निधी अर्पण

पुणे (प्रतिनिधी) :-
होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना समाजाने नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. गरिबीच्या झळामुळे विद्यार्थ्यांची प्रतिभा सुकून जाते. म्हणून समाजाने त्यांना आर्थिक सहाय्य केलेच पाहिजे. त्यांच्या प्रतिभेला वाचवून व जोपासून तिचा राष्ट्रनिर्माणासाठी उपयोग करून घेतला पाहिजे, असे विचार श्रीकाशीजगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. 
श्रावणमासानिमित्त चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात श्रावणमास अनुष्ठानाचा सांगता समारंभ झाला, त्यावेळी आशीर्वचन करताना ते बोलत होते. श्रावणमासात दक्षिणारूपाने मिळालेले १८ लाख रुपये त्यांनी चिंचवड परिसरातील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी सहायता निधी निर्माण करण्याच्या उद्देशाने आशीर्वाद म्हणून दान केले. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे, यासाठी हा सहाय्यता निधी देण्यात आला. 
ते पुढे म्हणाले की, प्रतिभा ही राष्ट्राची संपत्ती असून ती कोणत्याही जाति-धर्मातील व्यक्तीच्या ठिकाणी असू शकते. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळायला हवे. शासन, समाजसेवी संस्था, मठ आणि मंदिरे या सर्वांनीच हे कार्य करायला हवे. गरीब विद्यार्थ्यांना सर्व समाजाने शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केलेच पाहिजे, असे महास्वामीजी सर्वांना उद्देशून म्हणाले.
अनुष्ठान समितीचे प्रमुख महेश स्वामी, खंडूशेठ चिंचवडे, गुरुराज चरंतिमठ, बुरकुटे, जाधव आदींनी सांगता समारंभात महास्वामीजींना महावस्त्र, स्मृतिचिन्ह व गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांचा गाैरव केला. यावेळी ष.ब्र. गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य दहिवडकर व ष.ब्र. गंगाधर शिवाचार्य बार्शीकर हे शिवाचार्य उपस्थित होते. श्रावण महिन्यात महास्वामीजींचा जन्मदिनोत्सव येत असल्यामुळे त्यानिमित्ताने ज्या भागात अनुष्ठान असेल त्या भागातील विद्यार्थ्यांना आलेली गुरुदक्षिणा ते समर्पित करतात. २००२ पासून याप्रकारच्या सहायता निधी योजनेचा आरंभ झाला. सध्या महाराष्ट्रातील बार्शी, लातूर, परळी, बारामती इत्यादी ठिकाणी, कर्नाटकातील लिंगसूगुर, तेलंगणा प्रांतातील शादनगर, हैदराबाद आदी नगरांमध्ये श्रावणमास अनुष्ठानात मिळालेली गुरुदक्षिणा महास्वामीजींनी त्या त्या भागातील शैक्षणिक निधीसाठी अर्पण केली. २००७ मध्ये श्रीकाशीमहास्वामीजींच्या षठ्यब्दिपूर्ती महोत्सवामध्ये तुलाभाराच्या रूपाने मिळालेले एक कोटी रुपये त्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्पण केले. सध्या सर्व प्रांतांतील गरीब व होतकरू चारशे विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. या निधीच्या सहाय्याने शिक्षण घेतलेले विद्यार्थी उत्तम डॉक्टर व इंजिनीयर होऊन समाजसेवा करीत आहेत. काशीपीठाकडून घडणारे शिक्षणक्षेत्रातील हे अत्यंत मौलिक कार्य होय. शिष्यवृत्ती वितरणाचे प्रमुख कार्यालय सोलापूर येथे असून रेवणसिद्ध वाडकर प्रमुख म्हणून काम पाहतात. विद्यार्थ्यांचे अर्ज त्याठिकाणी आॅनलाईन रूपात स्वीकारले जातात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँकखात्यामध्ये शिष्यवृत्ती नियमितपणे जमा जाते. यामुळे हा सर्व व्यवहार पारदर्शी झालेला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी रेवणसिद्ध वाडकर यांच्याशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment