तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 September 2019

रोहीत शर्माच्या टि - २० तील स्फोटक खेळ्या                रोहीत शर्मा भारताचा सर्वात आक्रमक व आकर्षक फलंदाज असून तो जेंव्हा रंगात येतो तेंव्हा जगभरातील मान्यवर गोलंदाज त्याच्या समोर वेठबिगारासारखे वाटतात. नुकत्याच संपलेल्या एक दिवशीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत त्याने पाच शतके ठोकून आपल्या चिरपरिचीत हिट मॅन उपाधीचा प्रत्यय तमाम क्रिकेटप्रेमींना दिला. त्यानंतर झालेल्या विंडीज दौऱ्यात सफेद चेंडूच्या खेळात त्याला विशेष चमत्कार करता आला नाही. तर कसोटीत त्याला डावलण्यात आले. त्याच्या ऐवजी संधी मिळालेल्या हनुमान विहारीने संधीचे सोने करून मधल्या फळीत रोहीतची नाकाबंदी केली. परंतु रोहीतचं सुदैव की, सलामीवीर लोकेश राहुलची साडेसाती सुरूच राहीली, व द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टि - २० बरोबरच कसोटी संघातही सलामीवीर म्हणून त्याची निवड झाली. यामुळे त्याच्यावर जबाबदारी वाढली आहेच शिवाय संघातील आसन पक्के करण्यासाठी आपल्या खेळावर बारकाईने निगरानी ठेवावी लागणार आहे.

                 १५ सप्टेंबरपासून द. आफ्रिकेविरुध्द ३ टि-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार असून रोहीत भारताचा महत्वाचा खेळाडू आहे. रोहीत शर्माची गणना जगातील सर्वात धोकादायक व आक्रमक फलंदाजात होते. सफेद चेंडूच्या खेळात त्याने अनेक स्फोटक खेळ्या असून टि-२o प्रकारात सर्वाधिक ४ शतकेही त्याच्याच नावावर आहेत. आज आपल्याला रोहीतच्या टि- २० तील काही नेत्रदिपक  डावांविषयी माहिती देणार आहे.

                रोहीत शर्माची टि - २० तील सर्वात आकर्षक खेळी २२ डिसेंबर १९१७ रोजी इंदोर येथे श्रीलंकेविरुद्ध झाली. या खेळीत प्रथम फलंदाजी करताना भारताने रोहीतच्या आतिषी खेळाच्या जोरावर २० षटकात ५ बाद २६० धावा काढल्या. प्रत्युत्तरात लंका १८ षटकात १७२ धावातच भुईसपाट झाली. १२ चौकार व १० षटकारांच्या साह्याने रोहितने झंझावाती शतक ( ११८ धावा ) झळकविताना केवळ ४३ चेंडूचा सामना केला होता. याचा लाभ त्याला सामनावीर पुरस्कार मिळण्यात झाला.

               ६ नोव्हेंबर २०१८ रोजी लखनौ येथे विंडीजच्या गोलंदाजांची लक्लरं वेशीला टांगताना रोहीतने ८ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ६१ चेंडूत १११ धावा ठोकताना भारताला २० षटकात २ बाद १९५ अशी सन्मानजनक धावसंख्या रचून दिली. भारत ७१ धावांनी विजयी तर झालाच शिवाय रोहीत सामनावीरही ठरला.

              २ ऑक्टोबर २०१५ रोजी धर्मशाळा येथे रोहीतने आपली तिसरी धमाकेदार खेळी साकारली. १२ चौकार व पाच षटकारांनी सजविलेल्या या खेळीत रोहितने १o६ धावा कुटून भारतात १९९ धावांच्या डोंगरावर चढविले. परिणामत: भारताला सात गडयांचा विजय मिळाला व रोहीतला मॅन ऑफ दि मॅच पुरस्कारही !

              ८ जुलै २०१८ रोजी ब्रिस्टल येथे इंग्लंडच्या १९९ धावांचा पाठलाग करताना रोहीतने अवघ्या ५६ चेंडूत बरोबर १०० धावा ठोकताना पाच षटकार व ११ चौकारांची बरसात करत एक षटक राखून भारताला विजयी केले. सामनावीर अर्थातच रोहीतच ठरला.

             २७ जुन २०१८ रोजी डब्लीन येथे आयर्लंडविरुध्द भारताने प्रथम खेळताना २० षटकात ५ बाद २०८ धावा कुटल्या, रोहीतने त्यामध्ये ८ चौकार व ५ षटकार बुलकावले होते. यावेळी त्याला शतकाने हुलकावणी दिली. तो ९७ धावांवर बाद झाला.भारताने हा सामना ७६ धावांनी खिशात घातला तर रोहीतने सामनावीर पुरस्कार !

            रोहीत आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत आपल्या लौकीकाला न्याय देतो का ?  हे पाहणे मनोरंजक व औत्सुक्याचे ठरणार असून, रोहीतची चांगली खेळी त्याला आगामी कसोटी मालिकेसाठी मोठा आत्मविश्वास देणार आहे. त्यासाठी त्याला आपल्या सर्वांकडून शुभेच्छा !!!

लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२८२.

No comments:

Post a Comment