तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 September 2019

पाथरी विधानसभेत वंचित बहुजन देणार मातब्बर चेहरा असलेला उमेदवार?किरण घुंबरे पाटील

पाथरी:- विधानसभा निवडणुकीचे वारे मतदारसंघात जोरदारपणे वाहू लागले आहेत. सोशल मिडिया, विविध माध्यमांमधुन विविध नावांची जोरदार चर्चा ही सुरू आहे. रोजच ऐकायला येणाऱ्या नविन चेहरे, नावांमुळे कार्यकर्ते ही संभ्रमात आहेत. इच्छुकांच्या भाऊगर्दीतील उमेदवार मोठमोठे डिजीटल बॅनर, वर्तमानपत्रातुन जाहिरातीद्वारे वातावरणनिर्मिती करत आहेत. 

मतदारसंघातील अशा राजकीय परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीकडुन पाथरी मतदारसंघासाठी वलयांकीत, मातब्बर चेहरा देण्यात येण्याची शक्यता आहे. गावातील सोसायटीचा सदस्य, चेअरमन ते गावचा सरपंच, त्यानंतर पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती ते जिल्हा परिषद सदस्यपदापर्यंत मजल मारलेल्या या उमेदवाराच्या नावाच्या चर्चेने मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडुन यावेळेला २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडुन विधानसभेची उमेदवारी घोषित झालेले पण ऐन वेळेला आघाडी तुटल्याने माघार घेतलेले मातब्बर नेते आणि माजी जि.प. सदस्य चक्रधरराव उगले यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवरही त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा चालु आहे. चक्रधरराव उगले हे बहुजन चळवळीतील जुना आणि अनुभवी चेहरा म्हणुन ओळखले जातात. राजकारणातील त्यांचा व्यासंग आणि दांडगा जनसंपर्क, कामे मार्गी लावण्याची त्यांची पद्धत, सर्वपक्षीय जवळचे संबंध यामुळे त्यांच्या उमेदवारीवर गंभीरपणे विचार केला जात आहे. याबाबतीत 'तेजन्युज' च्या वतीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या बाबतीत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. 

वंचित बहुजन आघाडीकडुन अल्पावधीतच राज्यभरात प्रचंड मोठा जनसंपर्क उभा करण्यात प्रकाश आंबेडकर यांना मिळाले असुन मोठमोठ्या पक्षांच्या तोंडचे पाणी पळवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या नवख्या आणि परराज्यातील उमेदवाराने पाथरी मतदारसंघातुन २७ हजार ८०० मते घेत त्यावेळी धुमाकुळ घातला होता. या मतांचा टक्का यावेळी प्रचंड प्रमाणात वाढुन त्याचा थेट फायदाही उगले यांना मिळण्याची शक्यता आहे. 

पाथरी विधानसभा मतदारसंघात बहुजन समाजातील मराठा, मुस्लिम, बौद्ध, धनगर, माळी या समाजांचे प्राबल्य असुन त्यांची संख्या येथे ८० टक्के आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीचाही चांगल्या प्रकारचा लाभ त्यांना मिळेल. 

सध्या सुरु असलेल्या घडामोडींविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला असता, या मागे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ज्यांचा शब्द मोडत नाहीत अशा एका मोठे साहित्यिक व फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीला वाहुन घेतलेल्या मोठ्या व्यक्तीचा आग्रह असल्याचे समजते.

तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे अॅड प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन चक्रधर उगले हे त्यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतर मुंबई येथील वंचितच्या मुख्यालयात ते मतदारसंघनिहाय सुरू असलेल्या मुलाखतीसाठी उपस्थित रहातील, अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. याविषयी उगले यांच्याशी संपर्क केला असता, आपण मुंबईला जात असल्याचे सांगुन त्यांनी अधिक बोलणे टाळले.

No comments:

Post a comment