तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 22 September 2019

अॅशेस मालिकेतील विक्रमी यष्टीरक्षक कर्णधार             सन १८७७ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात जगातील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर तब्बल पाच वर्ष व ९ कसोटी सामन्यानंतर दोन संघात अॅशेसला नाट्यमयरित्या सुरुवात झाली. त्यानंतर या दोन देशातील कसोटी मालिकेला अॅशेस मालिका म्हणून ओळखले जाऊ लागले. सन १८८२ मध्ये पहिली अॅशेस मालिका खेळली गेली. या मालिकांमध्ये शेकडो खेळाडू खेळले. अनेक खेळाडूंनी दोन्ही संघाचें नेतृत्व केले. या नेतृत्व करणाऱ्या खेळाडूत खास करून स्पेशालिस्ट फलंदाजांचाच अधिक भरणा आहे. काही शुध्द गोलंदाजांनीही नेतृत्व केल्याची नोंद आहे. परंतु यष्टीरक्षकांनी नेतृत्व केल्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. परंतु या सर्व धामधुमीत केवळ तीनच यष्टीरक्षक कर्णधार असे आहेत की ज्यांनी यष्टीरक्षणा बरोबर सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

                ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सन २०१९ च्या अॅशेस मालिकेतील मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत एक दुर्मिळ चमत्कार घडला. तब्बल १२५ वर्षांनी ही ऐतिहासीक घटना घडली. सध्या ऑस्ट्रेलियाचं कसोटीत नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज टिम पेन हा करत आहे. या टिम पेनने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसह १४५ धावांची भागीदारी करताना स्मिथला द्विशतक करण्यात मोलाची साथ तर दिलीच पण संघाला ८ बाद ४९७ या डाव घोषित करायला लागणारी सुरक्षित धावसंख्या गाठून दिली. पेनने जरी ५८ धावांची अल्पशी खेळी खेळली असली तरी ती खेळी त्याला क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात घेऊन गेली. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाजाने अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचे नेत्तृत्व करताना अर्धशतकी खेळी करण्याचा केवळ दुसरा प्रसंग घडला. तर सव्वाशे वर्षातील केवळ तिसरी घटना घडली.

                      यापूर्वी सन १८९४ च्या अॅशेस मालिकेत सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व जॅक ब्लॅकहॅम या यष्टीरक्षक फलंदाजाने केले होते. त्यावेळी जॅकने ७४ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर हा योग जुळायला १२५ वर्षांचा कालावधी लागला. अॅशेस मध्ये अशी कामगिरी करणारा पेन तिसरा यष्टीरक्षक फलंदाज- कर्णधार ठरला. सन १९९८ मध्ये इंग्लंडचे नेतृत्व करताना अॅलेक स्टुअर्ट याने अॅडलेड ओव्हलवर नाबाद ६३ धावा बनविल्या होत्या.

                 सन २०१८ च्या द. आफ्रिका दौऱ्यात कर्णधार स्टीव्हन स्मिथ व उपकर्णधार डेव्हीड वॉर्नरने चेंडूशी छेडछाड केल्याचे निष्पण्ण झाल्याने त्यांच्यावर एक वर्षाची बंदी आली. त्या वेळी ऐनवेळी अननुभवी टिम पेनला ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने कर्णधारपदी बसविले. फलंदाजीपेक्षा यष्टीरक्षणात उजवा असलेल्या पेनने स्मीथ - वॉर्नरच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाचे भरकटलेले वारू सावरले. एक वर्षाच्या बंदिवासानंतर ते दोघे संघात परतले खरे पण पेनने त्या दोघांना कोणतीही वेदना न देता हाताळल्याने ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा कात टाकली. अॅशेस मालिका बरोबरीत सोडण्याइतपत पेनचे नेतृत्व सदृढ होते, परंतु त्यातही कांगारूसाठी समाधानाची बाब म्हणजे मागची अॅशेस मालिका त्यांनी जिंकली असल्याने अॅशेस त्यांच्याकडेच राहीला. शिवाय १७ वर्षानंतर ते इंग्लंडमधून अपराजितरित्या परतले. टिम पेनसाठी खरोखर विक्रम म्हणावी अशीच बाब म्हणावी लागेल.


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२८२.

No comments:

Post a comment