तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

ना.लोणीकरांच्या उपस्थितीत बीड जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

(प्रतिनिधी) :-  बीड जिल्हयातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज दि 06/09/2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा भाजपाचे निवडणुक निरीक्षक ना.बबनरावजी लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. बीड जिल्हयातील बीड, गेवराई, आष्टी-पाटोदा-शिरुर, माजलगाव, केज व परळी विधानसभेसाठी इच्छुक असणार्‍या एकुण 45 उमेदवाराच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयावर घेण्यात आल्या.

      महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या सुचनेवरून बीड जिल्हयातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा प्रभारी मा.आ.गोविंदराव केंद्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, संघटन सरचिटणीस सुभाष धस यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या.

      जिल्हयातील इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना.बबनराव लोणीकर म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा सरकारने मागील पाच वर्षात राज्यात प्रचंड विकासकामे केली असून महाराष्ट्राची जनता भाजपाला पुन्हा संधी देण्यासाठी इच्छुक आहे. बीड जिल्हयात ना.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नातून जिल्हयाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. आज बीड जिल्हयाचा सर्वांगिण विकास होत असून जिल्हयातील प्रलंबित असणारे अनेक प्रश्‍न ना. पंकजाताई मुंडे यांनी सोडवले आहेत. जिल्हयाच्या विकासासाठी या दोघी बहिणींनी कोटयावधीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बीड जिल्हयाचा अस्मितेचा रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लागला असून, बीड जिल्हयाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी ताईंच्या प्रयत्नातून 4802 कोटी रुपयाचे वाटरग्रिड योजना मंजुर करण्यात आली आहे. आज बीड जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय महामार्ग या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामे प्रगतीपथावर असून जनतेच्या हितासाठी प्रत्येक योजना खेचून आणण्यात ना.पंकजाताई मुंडे या यशस्वी झालेल्या आहेत. ना.पंकजाताई सांगितील तेच जिल्हयातील उमेदवार असतील व त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील सर्व विधानसभा भारतीय जनता पार्टी जिंकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीस ना.बबनराव लोणीकर, मा.आ.गोंविदराव केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मा.आ.गोविंदराव केंद्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी देखील समयोचित मार्गदर्शन केले. तर सुभाष धस यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment