तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!tej news

Friday, 6 September 2019

क्रिकेटपटूंनी प्रशिक्षकांना दिली अशीही गुरुदक्षिणा                   पाच सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. प्रत्येक जण आपापाल्या परीने आपल्या गुरुजणांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या ऐपती नुसार आपल्या शिक्षकांना भेटवस्तू देत असतो. प्रस्तुत लेखात आपण अशाच काही मान्यवर खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांना दिलेल्या भेटवस्तूंविषयी जाणून घेऊ या.

                 सचिन तेंडूलकर : - या महान खेळाडूला क्रिकेटची देवता म्हणून गणले जाते. अशा या देवमाणसाला घडविणारी व्यक्तीही तितकीच महान असणार ?  रमाकांत आचरेकर हे सचिनला आकार देणारे महागुरूच होते. दोघांचे व्यक्तिगत संबंधही शेवटपर्यंत तितकेच प्रेमाचे राहिले. आज आचरेकर सर या जगात नाहीत तरीही सचिन त्यांच्या प्रती असलेली आत्मीयता जपून आहे. सचिन आचरेकर सरांविषयी सांगतो की, सचिन ( तो ) कितीही चांगला खेळला तरी आचरेकर सर त्याला " वेल प्लेड " असे म्हणत नसायचे. कारण त्यांना पुढल्या वेळेस सचिनकडून अधिक सरस खेळाची अपेक्षा असायची. सचिनला जेंव्हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार " भारतरत्न " मिळाला तेव्हा तो घेवून सचिन सर्वप्रथम आचरेकर सरांकडे गेला.

              महेंद्रसिंग धोनी : - भारताच्या सर्वकालीन यशस्वी कर्णधारात याची गणना होते. धोनीच्या नेतृत्वात भारताने टि-२०, वनडे विश्वकप, चॅंपियन्स ट्रॉफी व कसोटीचे अजिंक्यपद मिळविले. झारखंड सारख्या अती मागासलेल्या राज्यातून जागतिक किर्ती गाठलेल्या या खेळाडूला घडविण्याचे कार्य केले ते केशव बॅनर्जी या ग्रेट गुरूने ! एकदा गुरू केशवजींनी धोनीला गुरुदक्षिणा म्हणून देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याची मागणी केली. ती धोनीने चार आयसीसी ट्रॉफी जिंकून बॅनर्जीं इच्छा पूर्ण केली.

             विराट कोहली : - भारताचा विद्यमान कर्णधार. सचिन तेंडुलकरनंतर अनेक विक्रम त्याने आपल्या नावे केले. जगातल्या मान्यवर क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. विराटच्या अंगात असलेल्या या गुणांना पारखून व त्यावर अहोरात्र मेहनत करून कोहलीचे विराट रुप जगासमोर आणणारे त्याचे गुरु आहेत राजकुमार शर्मा. सन २०१४ च्या शिक्षकदिनी विराटने आपल्या या महान गुरूला गुरुदक्षिणा म्हणून स्कोडा कार दिली.

             आशिष नेहरा : - हा भारताचा माजी जलदगती गोलंदाज. नेहरा एक सद्ग्रहस्थ म्हणून सुपरिचित आहे. सध्या आयपीएलमध्ये हैद्राबादचा गोलंदाजीचा प्रशिक्षक असून दूरचित्रवाणीवर समालोचनही करतो. आशिष लहानपणापासून दिल्ली स्थित सोनेट क्लब मध्येच क्रिकेट शिकला. आशिषला घडविण्यात त्याचे प्रशिक्षक तारक सिन्हांचा मोठा वाटा होता.

            एकदा तारक सिन्हा भाडयाने राहात असलेले घर बदलू इच्छित होते, परंतु त्यांना काहीही केल्या दुसरे भाडयाचे घर मिळत नव्हते. ही गोष्ट त्यांचा कसोटीपटू शिष्य आशिष नेहराच्या कानावर गेली. त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता एक टू बी एच के चा नवा फ्लॅटच आपल्या गुरूला भेट म्हणून घेऊन दिला.

             हार्दीक पंडया : - हा भारताच्या सर्व प्रारंपामधील सर्वात विश्वसनीय अष्टपैलू खेळाडू. लोकप्रियतेतही वरच्या क्रमांकावर आहे. सध्या तर त्याचा भाऊ कृणालही भारतीय संघातून खेळू लागला आहे.आयपीएलमध्ये दोघेही मुंबई इंडियन्सकडून खेळतात. आपल्या अष्टपैलू खेळाच्या बळावर अल्पावधीतच दोघेही नावारूपाला आले.

              गुरुविना पुढे जाणे शक्यच नाही. याची प्रचिती त्यांनाही आली. पंड्या बंधूंच्या प्रगती मागे त्यांचे गुरूजितेंद्रसिंग यांचाही मोठा वाटा आहे. याच जाणिवेपोटी सन २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर हार्दीक गुरूजींजवळ गेला. नंतर हार्दीक व कृणाल दोघेही गुरुजींना घेऊन एका आलिशान शोरूममध्ये गेले व एक चमचमती सुंदरशी कार आपल्या गुरूला भेट म्हणून घेवून दिली.

               आजच्या या धकाधकीच्या दुनियेत किती खेळाडू खरोखर आपल्या गुरुजनांविषयी  आदर भाव बाळगून आहेत ? परंतु जे काही गुरूविषयी आत्मीयता राखून आहेत, अश्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.

   लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

No comments:

Post a Comment