तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 4 September 2019

मोहम्मद शमीच्या मागे लागलाय अटकेचा ससेमिरा व बायकोचं शुक्लकाष्ट 

             भारताचा अतिशय प्रतिभावान जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या संकटाच्या जाळ्यात असा काही अडकला आहे की, त्याला त्याचा सामना करून स्वतःची मानसिकता जपण्याचे अवघड काम पार पाडावे लागणार आहे. सर्वात प्रथम भारताच्या सर्वच प्रकारच्या क्रिकेट संघात स्थान मिळविण्याची लायकी असूनही त्याला योग्य तो न्याय मिळत नाही. सन २०१३ मध्ये पाकिस्तानविरुध्द एकदिवसीय सामन्यात तर त्याच वर्षी विंडीजविरुध्द कसोटी पदार्पण करणाऱ्या शमीने आतापर्यंत ७० वनडेमध्ये १३१ तर ४२ कसोटयात १५३ बळी घेतले आहेत. शिवाय ७ टि २० सामन्यातही ८ बळी त्याच्या नावावर आहेत. शिवाय विश्वचषक स्पर्धेत हॅट्रीक घेण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.

               इतकी चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थिरावू दिले जात नाही. अप्रतिम प्रदर्शनानंतरही पुढील सामन्यात तो संघात राहील का याची शाश्वती नसल्याने तो सतत दबावात असतो. हे कमी की काय म्हणून त्याची अर्धांगिनी हसिन जहाँ हिने त्याच्यावर कौटुंबीक, शारिरीक व मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला असून या गुणी खेळाडूच्या खेळावर याचा विपरीत परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे.

                सन २०१४ मध्ये हसिन जहाँ व मोहम्मद शमीचा निकाह झाला. हसिन एक मॉडेल होती.आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा ताफ्यात ती चियर लिडर म्हणून सामील झाली. त्यावेळी शमी केकेआरकडून खेळायचा. त्या दरम्यान त्यांची ओळख - मैत्री - प्रेम व लग्न असं क्रमाने घडत गेलं. विशेष म्हणजे शमीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

               आपल्याला माहितीच आहे की, मागिल दिड वर्षापासून मोहम्मद शमी व त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. काही केल्या तो मिटाययं नावच घेत नाही. उलट त्याने या क्षणी उग्र रुप धारण केले आहे. बलात्कार, हाणमार, खूनाचा प्रयत्न, कौटुंबीक हिंसाचार यासारखे गंभीर आरोप शमीवर केले आहेत. याच केसच्या सुनावणीदरम्यान पश्चिम बंगालच्या अलीपूर येथील न्यायालयाने मोहम्मद शमी विरुद्ध अटक वॉरंट जारी केले असून शमीला १५ दिवसांत कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने शमीसह त्याचा भाऊ हसीब अहमद यालाही अटक वॉरंट काढले आहे.

             इतकेच नाही तर हसिन जहाँ हिने शमीवर अनेक आरोप लावताना, तो तिला घर खर्चाला पैसे देत नाही शिवाय कोणा परस्त्रीशी त्याचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप लावला असून त्याच कारणाने तो तिला तलाक देऊ इच्छितो असे हसिन जहाँचे आरोप आहेत. हे सर्व आरोप फेटाळताना शमीने उलट हसिननेच त्याला धोका दिल्याचे म्हटले आहे.

              सुरुवातीला हसिनने मोहम्मद शमीचा मोठा भाऊ हशीम अहमदवर बलात्कार केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर कोलकाता पोलिसांनी वैद्यकिय चाचणी केल्यानंतर हा आरोप खोटा असल्याचे सिध्द झाले. 

             मोहम्मद शमीच्या म्हणण्या नुसार हसिन जहाँशी त्याचा निकाह झाल्यानंतर समजले की ती एक घटस्फोटीत स्त्री आहे. मोहम्मद शमीशी विवाह होण्यापूर्वी हसिन जहाँचं पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील स्टेशनरी दुकान चालविणाऱ्या सैफुद्दीन या इसमाशी तिचे लग्न झाले होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सैफुद्दीनशी संपर्क साधला असता त्यानेही या गोष्टीला दुजोरा देताना आणखी काही माहिती दिली. सैफुद्दीन व हसिनचं २००२ मध्ये लग्न होऊन त्यांना दोन मुलीही होत्या. त्यानंतर सन २०१० मध्ये त्यांचा तलाक झाल्याचेही चौकशीत सैफुद्दीनने सांगितले

                सैफूद्दीन म्हणतो की, तो इयत्ता १० वीच्या वर्गात असल्यापासून हसिनवर प्रेम करायचा. हसीनला स्वतःच्या पायावर उभे राहाण्याची इच्छा होती, परंतु त्याच्या कुटुंबीयांचा घरातील महिलांचा नोकरी करण्याला विरोध होता. या प्रकारचे बंधन हसिनला मान्य नव्हते. हेच त्या दोघांच्या तलाकचं कारण बनलं.

               आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाच्या निर्णयावरच शमीचं व पर्यायाने त्याच्या क्रिकेट करिअरचं भवितव्य अवलंबून आहे. बघू या न्यायदेवतेच्या न्याय मंदिरात काय निकाल लागतो.

      लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
वर्ल्ड पार्लमेंट सदस्य.

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

मोबाईल : - ९०९६३७२०८२

No comments:

Post a Comment