तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 7 September 2019

मनगटी फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड        क्रिकेट हा असा खेळ आहे की याला कुठल्याही मर्यादा नाहीत. जर एखादया खेळाडूच्या अंगात क्रिडा नैपुण्य असेल तर त्याला कसलीच भिती नसते. त्याचं कौशल्याचं नाणं मातीत टाकलं तरी खणखणीत आवाज येतो. असाच एक अवलीया पाकिस्तानच्या क्रिकेट पटलावर चमकला. निव्वळ चमकलाच नाही तर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उंची वाढविण्यातही अग्रेसर होता.

           मनगटाचा साह्याने करामती लेगस्पीन मारा करणाऱ्या अब्दुल कादिर या गोलंदाजाचे ६ सप्टेंबर रोजी कार्डीयाक अॅटॅकमुळे निधन झाले. वेगवान गोलंदाजांची खाण असलेल्या पाकिस्तानमध्ये अब्दुल कादिर सारख्या लेगस्पीनरने आपल्या अदभूत गोलंदाजीने फिरकी गोलंदाजीला जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख करून दिली. कादिर मनगटाच्या साह्याने चेंडू फिरविणारा गोलंदाज होता. वेगवान गोलंदाजाला लाजवेल एवढी आक्रमक देहबोली त्याची असायची. गोलंदाजी करतानाचा त्याचा रन अप व गोलंदाजीची अॅक्शन एखादया कॅब्रे डान्सरला लाजवेल अशी होती. भारताचा महान खेळाडू सुनिल गावस्कर त्याची हुबेहुब नक्कल करायचा.

                   शेन वॉर्न या महान ऑस्ट्रेलियन लेगस्पीनरच्या उदयापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात अब्दुल कादीर नावाचा मोठा दरारा होता. कादीरला तर गुगलीचा बादशहा म्हणून संबोधले जायचे. त्याचे फ्लीपर तर इतके प्रभावी असायचे की जगातल्या चांगल्यात चांगल्या फलंदाजालाही मुश्किल पैदा व्हायची.

                   अब्दुल कादिर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ६७ कसोटी व १०४ एकदिवसीय सामने खेळला. सन १९७७ ते १९९३ या १६ वर्षांच्या कालावधीत त्याने पाकचे प्रतिनिधीत्व केले. कादीर फिरकी गोलंदाज असला तरी आक्रमकता वेगवान गोलंदाजाला लाजवेल इतकी जबरदस्त होती. कसोटी व वनडे मिळून त्याने एकूण ३६८ बळी घेतले. इंग्लंडचा माजी कर्णधार ग्रॅहम गुच हा कादिर व वॉर्न या दोनही दिग्गज गोलंदाजांची गोलंदाजी खेळला. बळी घेण्याच्या परिमाणात वॉर्न उजवा असला तरी लेगस्पीनच्या कलेत कादीर वॉर्नपेक्षा भारी होता असे गुचने मत नोंदविले.

                    सन १९८९ चा भारत पाकिस्तान सामन्यातील  एक किस्सा कादीरच नव्हे तर समस्त क्रिकेट जगतही कधीच विसणार नाही. १६ वर्षीय सचिन तेंडूलकरचा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय मोसम होता. बऱ्याच मोठया कालखंडानंतर पाक दौऱ्यावर भारतीय संघ जात होता, त्यातच सचिन सारखा एक षोडषवर्षीय मुलगा  पाकच्या तेजतर्रार आक्रमणाला कसा सामोरे जातो हा सर्वांसाठी औत्सुक्याचा विषय होता. त्यातच कादिरचाही मोठाच दबदबा असल्याने सचिन पुढे मोठेच आव्हान होते.

                   मालिकेतला पहिलाच एक दिवशीय सामना पेशावरला होता. परंतु खराब वातावरणामुळे एक दिवशीय सामना रद्द करण्यात आला. मात्र प्रेक्षकांची नाराजी टाळण्यासाठी २०-२० षटकांचा एक प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना पाकने १५७ धावा केल्या. भारताला शेवटच्या ५ षटकांत ६९ धावांची गरज असताना सामन्यात प्रभावी ठरत असलेल्या मुश्ताक अहमदच्या गोलंदाजीवर सचिनने दोन षटकार मारले. त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या मुश्ताकचा गुरू अब्दुल कादीरने सचिनला खुले आव्हान दिले, '' तुझ्यात हिम्मत असेल तर मलाही षटकार मारून दाखव " त्यानंतर सचिनने असा काही चमत्कार केला की तो आजही समस्त क्रिकेट जगत विसरले नाही.

                कादिरच्या या चॅलेंजला सचिन घाबरला नाही, उलट त्याने स्मितहास्य करत कादीरचा पहिलाच चेंडू सिमारेषेवरुन प्रेक्षकांत भिरकावला. त्यानंतर त्याच षटकांत सचिनने आणखी दोन चेंडू हवाई मार्गे प्रेक्षकांत फेकले. सचिनच्या जोरदार प्रहारानंतर कादीरचे अक्षरशः पाणी पाणी झाले.भारत हा सामना चार धावांनी हरले हा भाग अलाहिदा !                  

              कादिर सारखा मनगटी फिरकी गोलंदाज पाकमध्ये अजूनही पैदा झाला नाही. कादिरच्या गोलंदाजीचे आणखी ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्याची फसवी अॅक्शन व गोलंदाजीत असलेली विविधता. षटकातले सर्व चेंडू विविध पद्धतीने टाकण्याचे त्याचे कसब काही औरच होते.

              अब्दुल कादिर खान याचा जन्म १५ सप्टेंबर १९५५ रोजी पाकिस्तान स्थित पंजाब प्रांतातील लाहोर येथे झाला. उजव्या हातानेच लेगब्रेक गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करायचा. उस्मान कादीर हा पाकचा क्रिकेटपटू अब्दुलचा मुलगा होता. तर उमर व कामरान अकमल भाचे होते.

            ६४ व्या वर्षी या जगताचा निरोप घेणाऱ्या या कलंदर फिरकी बहाद्दराला विनम्र अभिवादन व अखेरचा सलाम !


           लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.     

No comments:

Post a Comment