तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ०जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणेने 686 वाहन सज्ज

 चिठ्यांचे वाटप
० 2263 मतदान केंद्र सज्ज, 20 लक्ष 39 हजार 435 मतदार

बुलडाणा, दि. 19 :  जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मलकापूर, सिंदखेड राजा, खामगांव, मेहकर व जळगांव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
    या निवडणूका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी  11 हजार 315 कर्मचारी  मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. प्रत्येक मतदान चमुमध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी आदींचा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एकूण 216 क्षेत्र असून त्याकरिता प्रत्येक क्षेत्राकरीता एक याप्रमाणे 216 क्षेत्रिय अधिकारी व 27 राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 243 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
     जिल्ह्यामध्ये एकूण 653 मतदान केंद्रे मुस्लीम बहुल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. विधानसभा मतदारसंघ स्तरावर साहित्य वाटप करण्यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप व मतदान माहिती  पुस्तिकांचे वाटप करण्यात आलेले आहे.
 प्रत्येक मतदान केंद्रांवर 13 सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये रॅम्प, पिण्याचे पाणी, फर्निचर, विद्युत व्यवस्था, मदत केंद्र, प्रसाधन गृह आदींचा समावेश आहे. तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअर, स्वयंसेवक, ब्रेल बॅलेट पेपर, भिंग, दिव्यांग मतदारांना ने- आण करण्यासाठी वाहनांची सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान चमु मतदान केंद्रावर पोहचल्याबाबतचा अहवाल त्याचप्रमाणे मतदानाच्या दिवशी अभिरूप मतदान व दर दोन तासांनी किती टक्के महिला व पुरूषांचे मतदान केंद्रांवर मतदान झालेले आहे, यासाठी पीडीएमएस प्रणाली कार्यान्वीत करण्यात आलेली आहे.    जिल्ह्यात 20 लक्ष 39 हजार 435 मतदारांची  नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत.  मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या 686 वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार आहे. त्यापैकी 258 एस.टी बसेस,  42 मिनी बसेस आहेत. तसेच 269 शासकीय वाहनांना यापूर्वीच जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात आलेली आहे.
  जिल्ह्यात एकूण 2 हजार 263 मतदान केंद्रांमार्फत ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल.  त्यापैकी 10 टक्के मतदान केंद्रांवर मतदान हालचालीचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात येणार आहे. त्यामध्ये पीडब्ल्यूडी मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र आदींचा समावेश आहे.   
_________________________                                                                                        
                वडगाव येथील मतदानावरील बहिष्कार मागे
 बुलडाणा, दि. 19 :  22 बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मोताळा तालुक्यातील वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या काही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्या बाबतचे जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी आज बुलडाणा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोखंडे ,गट विकास अधिकारी मोहोड साहेब, बुलडाणा नायब तहसीलदार अनंता पाटील ,गटशिक्षणाधिकारी पंढरी मोरे गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष चर्चा करून मतदाना वरील बहिष्कार मागे घेण्याबाबत विनंती केली असता गावकऱ्यांनी मतदाना वरील बहिष्कार मागे घेत असल्याचे लेखी निवेदन जिल्हा प्रशासनाला  याप्रसंगी दिले. वडगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन संपूर्ण गावात मतदान जनजागृती करण्यात आली.
     22 बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निर्भयपणे मोठ्याप्रमाणावर 21 ऑक्टोंबरला मतदान करावे, असे आवाहन बुलडाणा  विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश्वर हांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment