तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा कट -धनंजय मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याने सर्वत्र  सरकारवर टीका होत आहे. विधान परीषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीसुद्धा या ढोंगी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे. गेल्या ५० ते ६० वर्षांपासून ४थीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चूकीचा आणि अपमानास्पद असल्याचे त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये नमूद केले आहे.

 छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट असल्याचे म्हणत शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला २१ तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही असा उद्रेक त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसे स्थान देण्यात येत नसल्याची टीका राज्यातून सातत्याने होत असताना राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने नेमका तोच कित्ता गिरवायचे ठरविले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जनमनांतील अस्मिता तेवत ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा पदोपदी गजर होतो, मात्र महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आला आहे.

चौथीच्या वर्गाला शिवाजी महाराजांचा इतिहास हा गेली अनेक वर्षे  शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असताना १९९१ मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकांत काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या वादंगानंतर चौथीच्या पुस्तकांतील शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याबाबत विधिमंडळात ठराव झाला होता. त्यानंतर सरकार बदलले, अभ्यासक्रम बदलले तरी चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि शिवाजी महाराज हे समीकरण कायम राहिले. आता या पुस्तकात बदल करत आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे. या बदलामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याची भीती जनमनात निर्माण झाली आहे.

No comments:

Post a comment