तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 6 October 2019

भारत ऐतिहासीक कसोटी विजयासह गुणतालिकेत अव्वल            विशाखापट्टणमच्या डॉ.राजशेखर स्टेडीयमवर भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपदातंर्गत " गांधी - मंडेला स्वातंत्रता चषक " मालिकेतला पहिला कसोटी सामना ऐतिहासीक विक्रमांसह भारताच्या झोळीत पडला व भारताने गुणतालिकेतील आपले वरचस्व आणखी घट्ट केले.

                   या कसोटीच्या पहिल्या डावात भारताच्या डावाची पहिल्यांदाच सुरुवात करणाऱ्या मयंक अग्रवाल व रोहीत शर्मा जोडीने ३१७ धावांची विक्रमी भागीदारी केली. मयंकने पहिलं कसोटी शतक द्विशतकाच्या रुपात साजरे केले. पहिले कसोटी शतक द्विशतकाने साजरे करणारा तो चौथा भारतीय ठरला. तर रोहीत एक सलामीवीर म्हणून दोन्ही डावात शतक करणारा जगातला पहिला फलंदाज ठरला. या सामन्यात दोन्ही संघानी मिळून विश्वविक्रमी ३७ षटकार टोलवले. यापूर्वी सन २०१४-१५ मध्ये शारजा येथे पाकिस्तान - न्यूझिलंड कसोटीत ३५ षटकार मारले गेले होते. तसेच एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम रोहीतच्या नावावर लागला. रोहीतने दोन्ही डावात ७ व ६ असे १३ षटकार ठोकले.या सामन्यात भारताकडून रोहीतच्या १३ षटकारांव्यतिरिक्त मंयक अग्रवालने ६, रविंद्र जडेजा डिन एलगरने प्रत्येकी ४ षटकार मारले.

             रविंद्र जडेजा जलद २०० बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. तर रविचंद्रन आश्विनने सर्वात जलद ३५० बळी घेणाऱ्या गोलंदाजात मुथय्या मुरलीधरनशी बरोबरी साधली.

               भारताने मिळविलेल्या या ऐतिहासीक विजयाचे शिल्पकार जे ६ खेळाडू ठरले. त्यात रोहीत शर्माने कसोटी  सलामीवीराची भूमिका प्रथमच साकारताना स्वप्नवत कामगिरी करत दोन्ही डावात ( १७६ व १२७ ) ठोकताना ३०३ धावा कुटल्या व सामनावीराचा बहुमान मिळविला.

               भारताचा दुसरा सलामीवीर मयंक अग्रवालनेही आपली जबाबदारी पार पाडताना ( २१५ व ७ ) २२२ धावांची रास भारताच्या खात्यात ओतली. दहा महिन्यांच्या वनवासानंतर कसोटी खेळत रविचंद्रन आश्वीनने ( ७ व १ ) असे एकूण ८ बळी घेत स्वतःचे महत्व दाखवून दिले.

               पहिल्या डावात बळींची पाटी कोरी राहीलेल्या मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात निर्णायक क्षणी पाच बळी घेत भारताचा विजय सुकर केला. डावखुरा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा खऱ्या अर्थाने आपले बिरुद सार्थ ठरवत दोन्ही डावात मिळून ७० धावा बनविल्या. तर (२ व ४ ) असे ६ बळी मिळवून संघासाठी भरीव योगदान दिले. चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावातील अपयशाची भरपाई दुसऱ्या डावात ८१ धावा करून संघाची महत्वाच्या क्षणी गरज भागवून आपले कर्तव्य बजावले.

                 हि कसोटी जिंकून भारत गुणतालिकेत १६० गुणांसह प्रथम स्थानावर आले.तर न्यूझिलंड दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या, ऑस्ट्रेलिया चौथ्या, इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे. यापूर्वीच वेस्ट इंडिज दौऱ्यातील २ कसोटी जिंकून भारताने १२० गुणांची कमाई केली आहे.

                 तिन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना भारताने २०३ धावांनी जिंकून मालिकेत १-० आघाडी घेतली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील भारताने खेळलेले तीनही सामने जिंकले आहे. त्यामुळे सध्या कसोटीचे असलेले विजेतेपद भारताने आणखी भक्कम केले आहे. कसोटीची घटती लोकप्रियता लक्षात घेता आयसीसीने कसोटीची  विश्वकरंडक स्पर्धा सुरू केली. भारताला मायदेशातील सर्व सामने जिंकून विजेतेपदासाठी अंतिम सामन्याला पात्र ठरण्याची सुवर्णसंधी आहे. भारत ती कशी हाताळतो यावर पुढील प्रवास अवलंबून आहे.

                  मागील एका लेखात विश्व कसोटी अजिंक्यपदाचे संपूर्ण गुणसूत्र आपल्या समोर मांडले होते. परंतु आपल्या स्मृतीसाठी पुन्हा एकदा थोडक्यात आढावा घेऊ या. दोन सामन्यांच्या मालिकेतील एका विजयासाठी ६०, तीन सामन्यांच्या मालिकेतील एका विजयासाठी ४०, चार सामन्यांच्या मालिकेतील एका विजयासाठी ३०, तर पाच सामन्यांच्या मालिकेतील एका विजयासाठी २४ अंक मिळणार आहेत. 
 लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment