तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

सभ्य ग्रहस्थांच्या खेळातील काही लाजीरवाणे प्रसंग              क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून गणला जातो. परंतु नीट विचार केला तर जसा या खेळात रंगीत कपडयांनी शिरकाव केला तसा सफेद कपडयांच्या या खेळाला काळीमा लागायलाही सुरूवात झाली. त्याला अनेक कारणेही आहेत. बरेचसे जबाबदार घटकही जबाबदार आहेत. या अशा अनेक कारणांनी हा जेंटलमन्स गेम मोठया प्रमाणात डागाळला असून यामुळे काही प्रमाणात का होईना

याचे प्रशंसक कमी झाले आहेत. हे कोणीही नाकारू शकत नाही.

                क्रिकेटला शरमेने खाली घालायला लावणारी एक भर मैदानात कुप्रसिद्ध घटना घडली. १ फेबूवारी १९८१ रोजी. ऑस्ट्रेलिया - न्यूझिलंड यांच्या दरम्यान वर्ल्ड सिरीज चषकाचा अंतिम सामना खेळला जात होता. न्यूझिलंडला जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ग्रेग चॅपेल होता. शेवटचं षटक ग्रेगचा धाकटा भाऊ ट्रेव्हर चॅपेल हा टाकत होता, ग्रेगने त्याला शेवटचा चेंडू अंडर आर्म टाकण्याचा सल्ला दिला. त्या काळी अंडर आर्म चेंडूला कायदेशीर मान्यता होती. परंतु तसं करणं म्हणजे खिलाडूवृत्तीला धरून नव्हते. त्यामुळे अंडर आर्म  गोलंदाजी करायला नको होती.ब्रायन मॅकेनी हा शेवटचा चेंडू खेळत होता. त्याने गोलंदाज अंडर आर्म गोलंदाजी टाकताच रागाने बॅट फेकून दिली. त्याच वेळी नॉन स्ट्रायकर एंडला अॅगर १o२ धावा करून उभा होता. त्याने मोठया मेहनतीने न्यूझिलंडला विजयाच्या समीप आणले होते. ग्रेग चॅपेलच्या नकारात्मक चालीमुळे अॅगरचे शतक झाकोळले गेले. या शतकाला क्रिकेटमधील सर्वात दुर्लक्षित शतक गणले गेले कारण चॅपेल बंधूंनी त्या दिवशी भर मैदानात क्रिकेटचा अक्षरशः खूनच केला होता. त्यानंतर आयसीसीनेही आपल्या नियमात दुरुस्ती करत अंडर आर्म गोलंदाजी करण्यावर कायमची बंदी घातली.

                   ऑस्ट्रेलिया व विंडीज यांच्यातील एकदिवशीय सामना सुरू असताना प्रेक्षक अतिशय उत्साहीत झाले की, सामना चालू असताना अचानक मोठया संख्येने ते भर मैदानात घुसले. त्यावेळी फलंदाजी करत असलेला स्टीव्ह वॉ धाव काढत होता परंतु प्रेक्षकांचं मैदानात झालेलं अतिक्रमण बघून तो धावही पूर्ण करू शकला नाही. त्या उत्साही प्रेक्षकांनी मैदानातील स्टंप्स उपटून नेल्याच शिवाय स्टीव्ह वॉची बॅटही घेवून गेले. या अचानक झालेल्या घटनेने स्टीव्ह वॉ अक्षरश: भेदरून गेला होता. या दरम्यान क्षेत्ररक्षण करणारे विंडीज खेळाडूही भयभीत होऊन आपला जीव वाचविण्यासाठी सैरभैर धावत होते. या घटनेने परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली होती. शेवटी पोलिसांना मैदानात घूसून  प्रेक्षकांना नियंत्रीत करावे लागले. ही क्रिकेटच्या मैदानातील सर्वात खतरनाक घटना होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. परंतु ज्या प्रकारे सबंध मैदानाचा प्रेक्षकांनी घेतलेला ताबा बघता काहीही अनुचित प्रकार घडू शकला असता.

                    क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंकडून फसवा फसवीच्या अनेक घटना घडत असतात. परंतु सध्या कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण होत असल्याने खेळाडूंच्या छोटया छोट्या चुकाही पकडल्या जातात. अशीच एक घटना सन १९८४-८५ मध्ये ऑस्ट्रेलिया - विंडीज सामन्यात मेलबोर्नवर घडली. ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करत होता तर क्षेत्ररक्षण विंडीजचा संघ. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने एक फटका मारला व विंडीजचा क्षेत्ररक्षक रॉजर हार्परने सूर मारून झेल टिपला. परंतु झेल घेणाच्या प्रकीयेत चेंडू त्याच्या हातून सटकला. तरीही त्याने मोठया शिताफीने चेंडू जमीनीवरून उचलला व जोरदार अपिल केले. दोन्ही पंचानी आपसात मोठी चर्चा केली. टिव्ही रिप्ले बघितले व विंडीजचे अपिल फेटाळून लावले. त्यावेळी हार्परच्या खोटेपणाची उपस्थित प्रेक्षकांनी मोठी खिल्ली उडविली होती. या घटनेनंतर संपूर्ण क्रिकेट जगतात रॉजर हार्परची मोठी निर्भत्सना झाली होती.

                 ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न व विंडीजचा मर्लोन सॅम्युएल्स यांची दुश्मनी तशी जुनीच. सन २०१० मध्ये बांगलादेश प्रिमीयर लिग दरम्यान एका सामन्यात डेव्हीड हसी जेव्हा दुसरी धाव घेत होता तेंव्हा गोलंदाज सॅम्यूएल्सने त्याचा टि शर्ट धरून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्णधार शेन वॉर्न भयंकर चिडला. मग वॉर्नने त्याचाही शर्ट ओढून सॅम्यूएल्सला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहीली. हा सगळा प्रकार टिव्हीवर सर्वजणांनी उघडया डोळ्यांनी बघीतला. हे प्रकरण इथेच नाही थांबलं तर शेन वॉर्नने क्षेत्ररक्षण करताना एक थ्रो जाणूनबुजून सॅम्यूएल्सच्या अंगावर फेकला. त्यानंतर पुन्हा दोघांत वाद भडकला. त्यावर सॅम्यूएल्सने रागाने बॅट वॉर्नवर भिरकावली होती. नंतर पंचांनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.

             

लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल 

No comments:

Post a Comment