तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

राम कदम यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संजय भालेराव यांचे तगडे आव्हान


बाळू राऊत प्रतिनिधी 
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर जाण्याची तयारी करणाऱ्या भाजपा उमेदवार राम कदम यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संजय भालेराव यांनी आव्हान निर्माण केले आहे. राम कदम घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सर्वप्रथम मनसेच्या तिकीटावर आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला.
पारसीवाडी, चिरागनगर, असल्फा, सुर्य नगर, आझाद नगर, जगदुशा नगर हा झोपडपट्टीचा भाग या मतदारसंघात येतो.  या मराठीबहुल मतदारसंघात गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लीम आणि दक्षिण भारतीय मतेही आहेत भारतातील सर्वात मोठी दहीहंडी राम कदम यांनी घाटकोपर मध्ये लावली आणि त्यातच ते नावारूपास आले. २००९ साली मनसेची लाट होती. त्यावर स्वार होत मनसेच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक जिंकली व विधानसभेत प्रवेश केला
२०१४ साली ते भाजपाकडून आमदार म्हणून निवडून आले. २०१८ सालच्या दहीहंडी उत्सवात महिला विषयी वक्तव्यामुळे ते वादात सापडले होते. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली होती. काँग्रेसने घाटकोपर पश्चिममधून पक्षाचे मुंबई सरचिटणीस आनंद शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय राम कदम यांच्यासमोर मनसेच्या गणेश चुक्कल आणि वंचित बहुजन आघाडीच्या गणेश ओव्हाळ यांचे आव्हान आहे. २०१४ साली घाटकोपर पश्चिममधून शिवसेनेचे सुधीर मोरे दुसऱ्या स्थानावर होते. त्याखालोखाल मनसेचे दिलीप लांडे आणि काँग्रेसचे रामगोविंद यादव होते.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीनंतर संजय भालेराव यांनी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केला. गेली १४ वर्ष त्यांनी या मतदारसंघात काम केले आहे. त्यांची पत्नी अर्चना या मतदारसंघातून नगरसेवक आहेत. लोकांच्या मागणीखातर आपण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलो आहोत असे संजय भालेराव यांनी सांगितले. विभागातील जनता राम कदम यांच्यावर नाराज आहे.या भागात मोठया प्रमाणावर झोपडया असून इथे रहाणाऱ्या जनतेला पावसाळयात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो असे संजय भालेराव म्हणाले.
शिवसेना-भाजपामध्ये युती नसती तर भालेराव इथे सहज निवडून आले असते असे एका स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले. राम कदम शिवसेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. संजय भालेराव उभे राहिले नसते तर राम कदम यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले नसते असे या कार्यकर्त्याने सांगितले. मराठी मते ही कदम, भालेराव आणि चुक्कल यांच्यामध्ये विभागली जाणार आहेत.

No comments:

Post a comment