तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाकडे मोदींनी फिरवली पाठ; वंजारी समाजात नाराजीचा सूर! ; मृत्यूनंतरही भाजपकडून उपेक्षाच ! ; जाहिरातीत ही फोटो नाही
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना पक्षांतर्गत झालेला त्रास सर्वश्रुत आहे. मात्र भाजपकडून मुंडेंची उपेक्षा मरणोपरांतही सुरूच असल्याचे दिसते, आज परळीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गडावर जाणे टाळले. प्रदेश भाजपकडून राज्यभर महत्वाच्या सर्व दैनिकात दिलेल्या आजच्या परळी येथील सभेच्या जाहिरातींमध्येही स्व. मुंडेना स्थान नाही. त्यामुळे मुंडेंप्रेमी व वंजारी समाजात नाराजीचा सूर आहे. 

गेल्या 8 दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या मोदींच्या सभेची जिल्हा नव्हे तर राज्यभर चर्चा होती, स्व. मुंडे यांच्या मृत्यूसमयी त्यांच्या अंत्यदर्शनाला मोदी आले नव्हते त्यावेळीही अनेक मुंडे प्रेमीनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती.  भाजप गोपीनाथ मुंडे यांनी वाड्या वस्त्यांवर पोचवला. 2014 च्या दोन्हीही निवडणुकीत भाजपच्या विजयात गोपीनाथ मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु भाजप सत्तेत येताच मुंडे यांचे अपघाती निधन झाले होते. 

आज ऐन निवडणुकीत आपल्या उमेदवारांसाठी मतं मागायला आलेले मोदी प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला गेले परंतु ज्या स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे राज्यात ही सत्ता अनुभवायला मिळाली त्यांचा मात्र त्यांना व भाजपला विसर पडला! एकेकाळी भाजपमध्ये निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरून सतत कोंडी झालेले, अडचण सहन केलेले मुंडे मृत्यूनंतर सुद्धा भाजपकडून उपेक्षित असल्याने मुंडेंप्रेमींकडून व स्व. मुंडेंची शक्ती असलेल्या वंजारी समाजाकडून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच याचा फटका भाजपच्या सर्व उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागेल अशा भावना अनेक मुंडे प्रेमी तरुणांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a comment