तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

माहीम मतदारसंघात अटीतटीची लढत सदा सरवणकर विरुद्ध संदीप देशपांडे


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई : माहिमची जनता यंदा काय कौल देणार? कोणाच्या गळयात विजयाची माळ घालणार? याची सगळयांनाच उत्सुक्ता आहे. माहिम विधानसभा मतदारसंघात थेट दोन सेनांमध्ये लढाई आहे. इथे जय-पराजय हा शिवसेना आणि मनसे दोघांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण माहिम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे तर शिवसेनेचे पक्ष मुख्यालय शिवसेनाभवन या मतदारसंघात आहे. माहिममधून शिवसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे.
आधी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण माहिमला २००९ आणि २०१२ सालच्या अनुक्रमे विधानसभा आणि पालिका निवडणुकीत मनसेने भगदाड पाडले. मनसेने या निवडणुकीत स्थानिक मुद्यांवर भर दिला आहे तर शिवसेना कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्दावर मते मागत आहे. दादर, प्रभादेवी, माटुंगा, आणि शिवाजी पार्कचा भाग या मतदारसंघात येतो. या मराठीबहुल मतदारसंघावर सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण इथल्या मतदारांनी नेहमीच बदल करण्याला प्राधान्य दिले आहे.

२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई निवडून आले. शिवसेनेने आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिल्यामुळे सदा सरवणकर यांनी बंडखोरी करत काँग्रेसमधून निवडणूक लढवली. यात मनसेचे उमेदवार सरदेसाई यांना ४८ हजार ७३४ मत मिळाली, तर सरवणकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांनी ३९ हजार ८०८ मते घेतली. बांदेकर यांना ३६ हजार ३६४ मते मिळवली. सेनेला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता.
सरवणकर यांच्या घरवापसीनंतर २०१४ साली येथून तिकीट मिळाले. मोदी लाटेत सेनेने ही जागा राखली. त्या वेळी मनसेचे सरदेसाई हे ४० हजार ३५० मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या वेळी भाजपच्या विलास आंबेकर यांना ३३ हजार ४४६ मते मिळाली.
यंदा शिवसेना-भाजपा युती असली तरी शिवसेनेसाठी विजयाचा मार्ग सोपा नाही. सदा सरवणकर आणि संदीप देशपांडे दोघांचा दांडगा जनसंपर्क आहे. संदीप देशपांडे यांनी दादरमधून नगरसेवकही होते. २०१४ नंतर मनसेने केलेल्या वेगवेगळया आंदोलनांमध्ये संदीप देशपांडे नेहमीच आघाडीवर असायचे. आक्रमक नेता अशी त्यांची ओळख आहे. शिवसेना कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित करत आहे पण आम्ही स्थानिक मुद्दांवर लक्ष केंद्रीत केले आहे असे देशपांडे यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक राज्यासाठी असते. स्थानिक मुद्यांवर ही निवडणूक लढली जाते. पण म्हणून राष्ट्रीय मुद्यांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे सदा सरवणकर म्हणाले. जुन्या इमारतींचा पूनर्विकास, वाहतूक कोंडी, बेकायदा फेरीवाले आणि पार्किंग हे माहिम विधानसभा मतदारसंघातील मुद्दे आहेत. काँग्रेसने या मतदारसंघातून प्रवीण नाईक यांना उमेदवारी दिली आहे. पण काँग्रेसची या मतदारसंघात तितकी ताकत नाही. त्यामुळे मुख्य लढाई शिवसेना आणि मनसेमध्ये आहे.

No comments:

Post a comment