तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

पंतप्रधानांच्या सभेमुळे राष्ट्रवादींच्या नेत्यांची सभेला जाण्यापासून अडवणूक ; हेलिकॉप्टर परवानगी नाकारल्याने धनंजय मुंडे, खा.अमोल कोल्हेंच्या सभा रपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना फटका बसू लागला आहे. पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर दौर्‍यास परवानगी नाकारल्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा.अमोल कोल्हे यांच्यावर सभा रद्द करण्याची वेळ आली असून, या दोन्ही नेत्यांनी ही अडवणूक असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेल्या धनंजय मुंडे, खा.अमोल कोल्हे यांच्या सभांना महाराष्ट्रभर मागणी आहे. धनंजय मुंडे हे तर स्वतः उमेदवार असतानाही स्वतःच्या मतदारसंघासोबतच राज्यभरात ते मोठ्या प्रमाणावर प्रचार सभांमध्ये भाग घेत आहेत. हे दोन्ही नेते दिवसाच्या 6-6 सभांना उपस्थित राहतात. जास्तीत- जास्त लोकांपर्यंत पोहचता यावे यासाठी पक्षाने हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आहे. मात्र सातत्याने महाराष्ट्राच्या प्रचार दौर्‍यावर येणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारली जात आहे. 

खा.अमोल कोल्हे यांनी स्वतःचा एक सेल्फी व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करून याबद्दल संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान हे ही भाजपच्या प्रचारासाठीच येत आहेत, राष्ट्रीय कार्यासाठी नाही, असे असताना आम्हाला प्रचार करण्यापासून का रोखले जाते, असा सवाल केला आहे. धनंजय मुंडे यांनीही आपल्यासोबत असाच प्रकार झाल्याचे ट्विट केले असून, हे मुद्दामहून होत आहे का? मोदींना विरोधी पक्षांच्या नेत्यांची भिती तर वाटत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करून ही अप्रत्यक्षरित्या विरोधकांची गळचेपी असल्याचे म्हटले आहे. परळीत आज नरेंद्र मोदी यांची सभा असल्याने मुंडे यांच्या हेलिकॉप्टरलाही परवानगी नाकारल्याने त्यांना अनेक सभा रद्द कराव्या लागल्याने त्याचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसू लागला आहे. 

No comments:

Post a comment