तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

ना. पंकजाताई मुंडे यांना मताधिक्य देण्यासाठी धनगर समाजही एकवटला, धनगर समाजाची परळीत बैठक ; जयघोष करत दिला एकमुखी पाठिंबा

धनगर समाजाला सवलती दिल्या, आरक्षणही मिळेल - ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     धनगर समाजाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर जीवापाड प्रेम केले आणि माझ्यावरही त्यांचा विश्वास आहे. मी सदैव धनगर समाजाच्या सोबत आहे असे सांगून समाजाला विविध सवलती दिल्या आहेत आगामी काळात न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे असा शब्द भाजपा महायुतीच्या उमेदवार, राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी यांनी दिला. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात धनगर समाजाने त्यांना एकमुखी पाठिंबा दिला. 

       ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ धनगर समाजातील कार्यकर्त्यांची बैठक आज अक्षता मंगल कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, धनगर समाज आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे अतूट नाते होते, मीही त्यांचाच वारसा चालवित आहे. आपल्या नात्यात कधीच अंतर पडू देणार नाही असे सांगून गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे नाव वाढविण्याचे काम मी करीत आहे तर तेच नाव मिटविण्यासाठी बारामतीची मंडळी प्रयत्न करीत आहे, त्यांचे हे प्रयत्न येथील जनता कधीच यशस्वी होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंडे साहेबांनी वंचित आणि उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका घेतली. मीसुद्धा त्यांचाच आदर्श घेऊन मी काम करीत आहे. शेळी मेंढी पालन महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देऊन समाजाला आर्थिक हातभार लावला आहे. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनाही न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. सरकारमध्ये मी धनगर समाजाची वकील म्हणून काम करत असुन समाजाला सर्व सवलती दिल्या आहेत आणि न्यायालयात टिकेल असे आरक्षण सुद्धा मीच देणार आहे असा शब्द देऊन बुडत्या नावेत बसू नका राष्ट्रवादीचे आता काही खरे नाही. त्यांनी केवळ घराघरात भांडणे लावण्याचे काम केले मात्र विकासासाठी फुटकी कवडीही दिली नाही अशी टीका त्यांनी केली. 
      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपले आराध्य प्रभू वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आता त्यांच्या आशिर्वादाने मीही मंदिराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मी कधीच विसरता येणार नाही असा जिल्ह्याचा विकास करून दाखवणार असल्याचे सांगून धनगर समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण समाजाची ताकद माझ्या पाठीशी उभी करून मला भरभरून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. 
    यावेळी व्यासपीठावर शेळी मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले, रबदाडे मामा, जेष्ठ नेते प्रभाकर वाघमोडे, दिलिप अबा बिडगर, आबासाहेब काळे, माऊली बीडगर, शामसुंदर सोन्नर, रामभाऊ कोपनर, बळीराम गडदे, मुन्ना काळे, चंद्रकांत देवकते आदी मान्यवर उपस्थित होते.
      यावेळी धनगर बांधवांनी " येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडत ना. पंकजाताई मुंडे यांना एकमुखी पाठिंबा देत संपूर्ण धनगर समाज आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

No comments:

Post a Comment