तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 17 October 2019

अनिल कुंबळेच्या प्रशिक्षक पदावरूनच्या गच्छंतीचे राजकारण             अनिल कुंबळे हा भारतीय क्रिकेटमधीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील एक महान खेळाडू व व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध आहे.कुंबळेने भारतीय संघातील सामान्य खेळाडू ते विश्वविक्रमी गोलंदाज व कर्णधार ते प्रशिक्षक असा सर्वंकष प्रवास केला असून क्रिकेटची सर्वोच्य संस्था आयसीसीच्या प्रशासकिय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. एक गोलंदाज म्हणून त्याने जी ख्याती मिळविली तशी प्रशिक्षक म्हणून करामत दाखविण्याची मोठी संधी त्याला उपलब्ध झाली नाही. सन २o१७ च्या चॅपीयन्स ट्रॉफीनंतर कर्णधार कोहलीने कुंबळे विरूध्द बंडाचे निशाण फडकवताच कुंबळेला पदावरुन पायउतार होण्यास भाग पडले.

              २० जून २०१७ रोजी अनिल कुंबळेने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. परंतु याची धुसफूस व्हायला सुरुवात २५ मार्च २०१७ ला सुरुवात झाली. भारत व ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान धर्मशाळा येथे चौथा कसोटी सामना झाला. खांद्याच्या दुखापतीमुळे नियमित कर्णधार कोहली त्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी उपकर्णधार अजिंक्य राहाणेने नेतृत्व केले. परंतु वादाचा मुद्दा उपस्थित व्हायचं कारण तेथेच घडलं. संघ निवड करताना कोहलीच्या ऐवजी कोणाला खेळवायचे असा प्रश्न प्रशिक्षक अनिल कुंबळे व कर्णधार राहाणे यांना होता. त्यांनी कुलदिप यादवला संघात घेतले. त्याने ४ बळी घेवून त्याची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. भारताने तो सामना ८ गडी राखून जिंकलाही ! परंतु येथे कोहलीचा इगो दुखावला कारण त्याला त्या संघात कुलदिप ऐवजी फलंदाज खेळवावा असे कोहलीला वाटत होते. कुंबळेनी घेतलेला प्रत्येक निर्णय त्याला खटकत होता. वास्तविक येथूनच कुंबळेच्या गच्छंतीचा कृुटील डाव येथून खेळायला सुरुवात झाली होती.

               अनिल कुंबळे एक मितभाषी व जिज्ञासू माणूस ! त्याच्यातील कल्पकता त्याच्या शांत स्वभावामुळे भारतीय क्रिकेटमधील चमकत्या सिताऱ्यांच्या भाऊगर्दीत वर येऊ शकली नाही. परंतु प्रशिक्षकपद स्विकारल्यानंतर त्याला भारतीय क्रिकेटमध्ये साम्राज्य प्राप्त झालेल्या कोहलीशी सामना करावा लागला. दोघांचा स्वभाव भिन्न स्वभावाचा असल्याने त्यांच्यात एकवाक्यता होणे अवघड होते. अखेर झालेही तसेच. स्वतःच्या कारकिर्दीत शिस्तबद्ध असलेला कुंबळे प्रशिक्षक बनल्यावर कडक मुख्याधापकासारखा भासू लागताच बेलगाम वागण्याची सवय लागलेल्या क्रिकेटपटूंना नकोसा वाटू लागला. जुलै २०१६ ला विंडिज दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंसाठी कुंबळेनी कडक नियमावली बनविली होती. ती खास करून कोहलीला पसंद नव्हती.  चॅंपियन्स ट्रॉफीनंतर कोहलीने थेट बीसीसीआयलाच पत्र लिहून कुंबळेंविरूध्द नाराजी प्रकट केली.

                एक कोच म्हणून कुंबळेची कामगिरीही चांगली होती. १७ पैकी १२ कसोटीत विजय, केवळ एकच पराभव, शिवाय एकही मालिका गमावली नाही.वनडेतही १३पैकी ८ विजय, टि - २o मध्ये ५ पैकी २ विजय, २ पराभव, १ सामना रद्द अशी चांगली कामगिरी असूनही चुकीच्या राजकारणाचा बळी कुंबळे ठरला. सचिन तेंडूलकरच्या माध्यमातून या वादावर तोडगा काढण्याचाही प्रयत्न बीसीसीआयने केला. परंतु तो वाया गेला.

               वास्तविक कुंबळेची भूमिका खेळाडू व संघाच्या हिताचीच असायची. कुंबळेनी प्रशिक्षकपद स्विकारण्यापूर्वी खेळाडूंना एखादी मालिका संपल्यानंतर सहा -सहा महिने मानधन मिळत नव्हते. ते कुंबळेनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षांशी चर्चा करून त्यावर यशस्वी तोडगा काढला. परंतु बीसीसीआयच्या जुन्या अधिकाऱ्यांना तो त्यांच्या कामात अडथळा वाटला मग त्यांनीही कुंबळेच्या गच्छंतीसाठी दुजोरा दिला.

                कुंबळेला अपमानीत होऊन प्रशिक्षक पद सोडावे लागले. खरे तर त्याच्या सारख्या जिगरबाज लढवय्या खेळाडूसाठी तो वाईट क्षण होता. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये घडलेला हा काही पहिलाच प्रसंग नव्हता. यापूर्वीही अनेक मातब्बर खेळाडूंना अपमानीत व्हावे लागले होते. प्रशिक्षक व कर्णधार यांच्यातील वादाचा बळी ठरलेला कुंबळे देशासाठी एक मानाचा तुरा असताना त्याची झालेली गच्छंती क्रिकेटसाठी दुःखद घटना होती.

               १७ ऑक्टोबर हा या महान विक्रमी गोलंदाजाचा जन्मदिन असल्याने त्याला मनःपूर्वक शुभेच्छा !

               लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment