तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 October 2019

शिवसेना राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे


बाळू राऊत प्रतिनिधी 
 मुंबई,दि.९ :  विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालो आहे. एका महिन्यात दोन विजयादशमी, एक आजची (दसरा मेळावा) आणि दुसरी २४ तारखेची तसंच लगेच दिवाळी असा योग क्वचित येतो, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

'शिवतीर्था'वर सुरू असलेल्या सेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी युतीमधील तडजोड, राम मंदिर, शिवसेनेची धोरणं यावर भाष्य केलं तसंच विरोधकांवर टीका केली.

दादर येथील शिवाजी पार्कवर पार पडणारा 'दसरा मेळावा' हा शिवसैनिकांसाठी नेहमीच खास असतो. शिवसेना स्थापन केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा घेण्याचा पायंडा पाडला होता.

राम मंदिर प्रकरणी न्यायालयानं न्याय दिला तर ठीक आहे, नाहीतर मंदिरासाठी विशेष कायदा करा, ही शिवसेनेची मागणी कायम आहे. आम्हाला राजकारणासाठी राम मंदिर नको आहे. ती देशाची आणि हिंदुंची मागणी आहे. प्राण जाए पर वचन ना जाए, हीच शिवसेनेची नीती आहे. आम्ही वचन दिलंय आणि ते पाळणारच, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "युती केल्यावर अनेकांना वाटलं, की शिवसेना झुकली. आम्ही केवळ भाजपची अडचण समजून घेतली. आता तुम्ही महाराष्ट्राची अडचण समजून घ्या, असं मी भाजपला म्हणतो".

देशात अस्थिर सरकार येऊ नये यासाठी लोकसभेला युती केली. लपून-छपून शिवसेना काही करणार नाही. आम्ही वैरही उघड करू आणि प्रेमही उघड करू. म्हणूनच आम्ही युती केली, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

युतीबद्दल बोलताना पुढे त्यांनी म्हटलं, "आम्ही हिंदुत्वासाठी भाजपशी युती केली. भाजपला पाठिंबा नाही द्यायचा, तर काय कलम ३७० ला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला द्यायचा?"

काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकली आहे, या सुशीलकुमार शिंदेंच्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. काय करून थकलात, असा प्रश्न विचारून उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, की काँग्रेस-राष्ट्रवादीनं एकत्र यायला हवं असं सुशीलकुमार यांनी म्हटलं. पण एकत्र येण्याआधी त्यांनी आपला नेता कोण हे ठरवावं.

अजित पवारांना टोला

अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. मगरीचे अश्रू ऐकले होते, ते प्रत्यक्ष पाहिलेही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावर लगावला.

"तुमच्या डोळ्यात तुमच्या कर्माने अश्रू आले आहेत, माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते ते तुम्हाला दिसले नाहीत", असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सुडाचं राजकारण सेना सहन करणार नाही
शरद पवार यांना ईडीनं बजावलेल्या नोटीशीबद्दल उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, की सत्ता असल्यामुळे सुडाचं राजकारण केल्याचा आरोप आमच्यावर केला. सूडाचं राजकारण कुणी करायला गेलं तर सेना सहन करणार नाही. पण २००० साली शिवसेनाप्रमुखांबरोबर जे केलं ते काय होतं ?

शिवसेनाप्रमुखांवर 'सामना'च्या अग्रलेखाच्या निमित्तानं जो खटला दाखल केला, ते सुडाचं राजकारण नव्हतं ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

बाबरी मशीद पडली तेव्हा शरद पवार आणि कंपूचंच सरकार होतं. तेव्हा आपल्यासोबत कोणी नव्हतं. तुम्हा शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेनाप्रमुखांनी मुंबई वाचवली, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांना करून दिली.

शिवसेना काय करणार?

मी सत्तेत होतो, सत्तेत आहे आणि सत्तेत राहणार हा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यावर आपले प्राधान्यक्रम काय असतील हे नमूद केलं.

शेतकऱ्यांसाठी मला कर्जमाफी नको आहे, कर्जमुक्ती हवीये असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

१० रुपयांत जेवणाची थाळी देणार, वीज वापराचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार तसंच सुदृढ महाराष्ट्रासाठी १ रुपयांत रोगांच्या चाचण्या करणारी केंद्रं स्थापन करणार, अशी आश्वासनं उद्धव ठाकरे यांनी दिली.

बाळासाहेबांची धोरणं जगानंही स्वीकारली

३७० कलम, राम मंदिर शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न होतं. या विषयांवर अमित शाह बोलल्याप्रमाणे वागत आहेत. बांगलादेशी घुसलेत त्यांना बाहेर हाकला ही पण शिवसेनाप्रमुखांची भूमिका होती.

भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य हवं, हा विचार बाळासाहेबांनी मांडला. आज अमेरिकेत ट्रंपही भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याबद्दल आग्रही आहेत. ५० वर्षांनंतर आज शिवसेनाप्रमुखांचे विचार जगाला पटत आहेत.

No comments:

Post a Comment