तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 18 October 2019

कर्तृत्वाच्या बळावर " जंबो " बनलेला भारतीय गोलंदाज             सन १९९० चा अंतिम टप्पा, त्या काळी फलंदाजांचा बोलबाला होता. भारतातही दर्जेदार फिरकी गोलंदाजांची वाणवा जाणवायला लागली होती. त्याच कालखंडात एक ६ फूट १ इंच उंचीचा, सडसडीत बांध्याचा चष्माधारी पेशाने इंजिनिअर असलेला फिरकी गोलंदाज भारतीय संघात आला. पाहता पाहता त्याच्या चमकदार कामगिरीने त्याने संघासाठी साठी भरीव योगदान देत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलायला सुरुवात केली. शांत संयमी स्वभावाबरोबरच मितभाषीपणा त्याच्या व्यक्तिमत्वात भर घालत असताना या पठ्ठ्याने भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेण्याचा बहुमानही मिळविला. याच बरोबर मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न या फिरकी बांधवां पाठोपाठ कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाने ६१९ बळी घेत जागतिक क्रिकेटमध्येही मानाचं स्थान मिळविले.

                १७ ऑक्टोबर १९७० रोजी कृष्णास्वामी व सरोजा यांच्या घरी या गोंडस बाळाचा जन्म झाला. आपल्या अदभूत कर्तबगारीने "जंबो'' असे नाव कमावलेल्या या लेगस्पिनर गोलंदाजाचे नाव आहे अनिल कुंबळे !

                 उजव्या हाताने लेगस्पीन गोलंदाजी करणाऱ्या कुंबळेच्या गोलंदाजीचे वैशिष्टये म्हणजे सर्व सामान्य लेगब्रेक गोलंदाजा प्रमाणे त्याचे चेंडू लेगब्रेक न होता जास्त करून ऑफ ब्रेक व्हायचे. शिवाय त्याच्या चेंडूची गती सर्वसामान्य फिरकी गोलंदाजांच्या तुलनेत जास्तच होती. त्यामुळे फलंदाज बुचकळ्यात पडायचे व कुंबळेला आपली विकेट बहाल करून तंबूत परतायचे.

                  मेकॅनिकल इंजिनियरींगची पदवी संपादन केलेला कुंबळे उच्च शिक्षण घेतलेल्या जगातील मोजक्या खेळाडूंच्या गटात समाविष्ठ आहे. अनिल लेगस्पीन गोलंदाजीकडे वळण्यापूर्वी सुरुवातीच्या काळात जलदगती गोलंदाजी करायचा. परंतु नंतर फिरकी गोलंदाजीत त्याने सर्वस्व वाहिले.

               पाकिस्तानविरूध्द दिल्ली कसोटीत एका डावात सर्वचे सर्व दहा गडी बाद करण्याचा कसोटी इतिहासातील दुसरा कारनामा कुंबळेने करून विक्रमांचा्या पुस्तकात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. त्या कसोटीत ४२o धावांचा पाठलाग करताना पाकच्या सलामीविरांनी शतकी सलामी दिली होती. परंतु कुंबळेच्या करिश्माई गोलंदाजीने पाकचा डाव २०७ धावात गडगडला व भारताने २१२ धावांनी सामना खिशात घातला.

                   सन २००७ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेटमध्ये दोलायमान स्थिती झाली होती. त्यातच कसोटी संघाची स्थिती वाईट बनली असताना राहुल द्रविडने कर्णधारपद सोडले, गांगुलीचे संघातील स्थानच धोक्यात होते. सचिनने पुन्हा नेतृत्व स्विकारण्यास नकार दिला. सेहवाग निवड समितीला पसंद नव्हता, वनडे संघाचं नेतृत्व नवख्या धोनीकडे सोपविले, पण कसोटीचं नेतृत्व स्विकारायलाच कोणी तयार नव्हतं. अशा स्थितीत कुंबळेने संघाची धुरा स्विकारली. स्वतःच्या पहिल्याच नेतृत्वाच्या कसोटीत कुंबळेने चमत्कार करत पाकला धुळ चारत स्वतः सामनावीर  पुरस्कारही कमावला.

                  खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर कुंबळेने भारतीय संघाचं प्रशिक्षकपदही भूषविले.कोच म्हणून कामगिरीही चांगली केली परंतु कर्णधार कोहलीशी ताळमेळ न जुळल्याने त्याला राजीनामा दयायची वेळ आली. सन २०२० आयपीएल सत्रासाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याने कुंबळेचे प्रशिक्षक म्हणून पुनर्जिवन झाल्याचे संकेत मिळत आहे. 


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment