तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 19 October 2019

कन्हेरवाडीत लेकीच्या सभेला तुफान गर्दी ; जनतेच्या प्रेमाची पावती विकास कामातून दिली; गोपीनाथ मुंडे हे नाव संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव - ना. पंकजाताई मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १९---- आपण र्‍हदयात कायम कोरून ठेवलेले "गोपीनाथ मुंडे" हे नाव संपविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे, त्यासाठी घरभेदी कामाला लावला आहे, पण स्वाभिमानी जनता साहेबांच्या नावाला धक्काही लावू देणार नाही असा विश्वास व्यक्त करून मायमाऊलींच्या पदराची सावली माझ्यावर कायम ठेवुन आपल्या लेकीला मतदानातुन पाठबळ द्या अशी साद भाजपा महायुतीच्या उमेदवार,  ना. पंकजाताई मुंडे यांनी कन्हेरवाडी येथील सभेतुन घातली. "ताई, लोकसभेप्रमाणेच तुम्हालाही मताधिक्य देऊ" असा शब्द मतदारांनी दिला. 

   ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कन्हेरवाडी येथे सभा झाली. सकाळी सभा असुनही महिलांची मोठी उपस्थिती होती. ढोलताशांच्या गजरात त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी बोलताना ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मुंडे साहेबांवर कनेरवाडीने सुरूवातीपासून प्रेम केले, साहेबांनंतर मी आणि प्रितमताई यांच्यावरही भरभरून प्रेम केले आहे ही माया अशीच कायम राहू द्या असे भावपूर्ण उदगार काढून त्या म्हणाल्या की, विरोधकांनी गोपीनाथ मुंडे हे नाव संपवण्याचा विडा उचलला आहे. याच जनता जनार्दनाने तळहाताच्या फोडाप्रमाणे नेतृत्व जपले आहे. गोपीनाथ मुंडे हे नाव आपल्यासाठी सौभाग्याचं लक्षण आहे, ते कधीही पुसू देणार नाही असे ठणकावून सांगत "गोपीनाथ मुंडे" हे नाव संपवायला तीन जन्म घ्यावे लागतील असे त्या म्हणाल्या. संकटाच्या काळात साहेबांना सोडून गेलेले आता मतासाठी साहेबांचे नाव घेत आहेत, पण हे बेगडी प्रेम जनता ओळखुन आहे. असे सांगून मोदी यांनी गोपीनाथ गडाकडे पाठ फिरवल्याचे सांगतात पण जिवंतपणी मरणयातना देणार्‍यांना आताच प्रेम कसे आले असा सवाल करून तुम्ही आदरणीय अण्णांच्या समाधीला साधी फरशी तरी लावली का असेही त्या म्हणाल्या. 

प्रेमाची पावती कामातून

मी निवडून आल्यापासून विकासाला गती दिली तर मंत्री झाल्यानंतर विकास गंगाच आणली कनेरवाडीला पाणीपुरवठा योजना मंजूर केली, तसेच रस्ते आणि आरोग्याचे प्रश्न सोडवले. गाव राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. पुढील काळात काळात विकासाची गती आणखी वाढणार आहे. परळी ते अंबाजोगाई हा रस्ता मुद्दाम माझ्या बदनामीसाठी अडवला आहे पण तेही काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. गावागावात आणि घराघरात विकास पोंहचविला आहे. माझ्या माता भगिनींचा त्रास कमी केला आहे तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवले आहे. आगामी काळात ही चळवळ अधिक गतीमान करून महिलांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. विकासाचा पाया मी रचला आता विकासाचा कळसही मीच बसवणार आहे त्यासाठी मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. आपल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरून आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले. 

जानकरांचे आवाहन

यावेळी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले की, पंकजा, प्रितम आणि यशश्री या तिन्ही बहिणी नेहमी काही तरी देण्यासाठी येतात. यावेळी त्या मताचे दान मागत आहेत त्यांना निराश करु नका. मुंडे भगिनी या मुंडे साहेबांचे नाव वाढविण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांनी साहेबांचा आपला मान, सन्मान वाढवण्याचे काम केले आहे आपण त्यांना भरभरून आशिर्वाद द्यावेत असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासपाचे प्रदेशाध्यक्ष तथा कनेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांनी केले. 
          कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे, पांडुरंगराव फड, श्रीराम मुंडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानोबा (माऊली) फड, भास्कर नाना रोडे, विलास मुंडे, रामहरी फड, भगवान फड, विष्णू मुंडे, प्रल्हाद गित्ते, बंडू कंडूकटले, रामहरी फड, बालासाहेब फड, विकास मुंडे, अमोल रोडे, गणेश मुंडे, गंगाधर रोडे, महादेव कंडूकटले आदी उपस्थित होते. 

समाजाच्या माणसांना जेलमध्ये टाकणारे आपले काय हित करणार - राजेभाऊ फड

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समाजाबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवतात पण आपल्याच समाजाच्या नेत्याला जेलमध्ये टाकण्याचे पाप करणारे लोक समाजाचे काय भले करणार असा सवाल रासपाचे नेते तथा सरपंच राजेभाऊ फड यांनी केला खोटा प्रचार आणि जातीचे राजकारण करणार्‍यांना या निवडणुकीत धडा शिकवून विकासासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी महायुतीच्या उमेदवार ना. पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

No comments:

Post a comment