तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 October 2019

घाटकोपर मधील सभेत राज ठाकरे यांनी सरकारला धरले धारेवर सरकार नोकरी विषयक माहिती मराठी, स्थानिक मुला मुलींपर्यंत पोहचू देत नाही



बाळू राऊत प्रतिनिधी 
मराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिमचे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक अमृत नगर घाटकोपर पश्चिम येथे करण्यात आले होते. पुण्याची सभा पावसाने हजेरी लावल्यामुळे स्थगित झाली होती त्यामुळे घाटकोपर पश्चिम येथील सभेत राज ठाकरे आता सरकारवर कशाप्रकारे निशाणा साधणार याकडे सर्वाचे लक्ष्य लागून होते. 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमधील सभेत भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या दही हंडीतील विधानाचा दाखला देत त्यांच्यासह भाजपवर तोफ डागली. आमच्याकडे होता तोपर्यंत राम होता भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला. अशा शब्दांत त्यांनी राम कदम यांच्यावर टीका केली. मुलगी पसंत पडल्यावर तिला उचलून घेऊन येऊ म्हणणाऱ्या आमदाराला पुन्हा तिकीट मिळते. तुमच्या नाकावर टिच्चून भाजपने त्यांना तिकीट दिले. आम्ही काहीही करु शकतो असेच भाजपला यातून दाखवयचे आहे.
तुमच्या पोरीबाळींचा अपमान केला असला तरी त्याला आम्ही परत तिकीट देऊ, मतदान झाल्यानंतर तुम्ही जगलात काय आणि मेलात काय या सरकारला फरक पडत नाही.बहुमत मिळाल्याने सरकारचा माज वाढलाय, आपल्याला अपमान गिळण्याची सवय लागली आहे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारचा समाचार घेत जनतेला जागे करण्याचा प्रयत्न केला.
नोकरीच्या संधी असतात तेव्हा आधी माहिती मिळते ती परप्रांतीयांना मग मराठी मुलांना. हे असं का घडतं? कारण या सगळ्याला सरकार जबाबदार आहे. सरकार ही माहिती मराठी, स्थानिक मुलांपर्यंत पोहचू देत नाही. त्यामुळे संधी दुसऱ्यांना मिळते असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.आपल्या देशात निवडणूक हा धंदा झाला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. राज ठाकरे म्हणाले, “निवडणुका येतच असतात कारण आपल्या देशात हा धंदा झाला आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद मग परत लोकसभा हे चक्र सुरुच असतं. निवडणूक आली की हल्लागुल्ला केला जातो. खासदारांची सत्ताधाऱ्यांची कामं पाहिलीच जात नाहीत. त्यावेळच्या समोर आलेल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते जिंकली जाते ” अशी टीका राज ठाकरेंनी घाटकोपर येथील सभेत केली.
या सभेत त्यांनी आज परप्रांतियांच्या मुद्यावरही भाष्य केले. महाराष्ट्रामध्ये जवळपास उत्तर भारतामधून दररोज ४८ ट्रेन भरुन येतात आणि रिकाम्या जातात. राज्याला आकार उकार राहिलेला नाही. उद्योग कोणता करायचे. इथे येऊन परवाने कसे काढायचे ते त्यांना बरोबर कळते. मराठी लोकांना मात्र याची कल्पनाच नसते. आमच्या मराठी तरुणांना नोकरीच्या संधी, अन्य उद्योगासंदर्भातील परवान्याबद्दल माहिती कोण सांगणार? सरकार तुम्हाला गृहीत धरतय.  त्यामुळेच महाराष्ट्राला आज सक्षम आणि खंबीर विरोधी पक्ष हवा आहे. याच उद्देशातून मी निवडणुकीच्या मैदानात उतरलोय. विरोधी पक्ष बहुमतातील सरकारे तुम्हाला चिरडून टाकतील. मी कोणत्याही मंत्र्याकडे कधीच खासगी काम घेऊन गेलो नाही, त्यामुळेच मी यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो. असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment