तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 October 2019

सेलूतील सभेत योगींची नरेंद्र -देवेंद्र स्तुती; मूळ प्रश्नांना दिली बगल
सेलू / प्रतिनिधी : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकरी कर्जमाफी, पिक विमा, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ परिस्थिती तसेच मतदार संघातील स्थानिक प्रश्नांना बगल देत केंद्र व राज्य सरकारच्या कामांचा पाढा वाचत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुरूवारी दि.१० रोजी सेलू (जि.परभणी ) येथे आयोजित प्रचार सभेत स्तुतीसुमने उधळली. 
जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. 
माजी अामदार रामप्रसाद बोर्डीकर, उमेदवार  मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, उपजिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, नगराध्यक्ष विनोद बोराडे, महामंत्री शशीकांत देशपांडे, सभापती रवींद्र डासाळकर, तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर,  अादींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 
काश्मीर मधील रद्द केलेले ३७० कलम, पाकिस्तान, पुलवामा ही कामगिरी, आतंकवाद, नक्षलवाद, विविध विकास कामे आदी मुद्यांवरच ते अधिक बोलल्याने उपस्थितांचा चांगलाच हिरमोड झाला. मात्र, त्यांनी मराठवाडा मागील चार वर्षापासुन दुष्काळाने होरपळत असला तरी त्याबद्दल ब्र शब्द देखील काढला नाही. मागील चार वर्षापासून होत असलेल्या शेतकरी आत्महत्या, मतदार संघातील शेतकर्‍यांना पीक विमा भरून एक रुपयाही विमा आला नाही, शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त, शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली नाही, आरोग्य विमा, मुद्रा लोन, पिक कर्ज, सिंचन अनुशेष  अशा अनेकविध प्रश्नांकडे त्यांनी सपशेल दुर्लक्ष केले. 
केवळ शासनस्तरावरून योजनांचा पाऊस पडत असला तरी मात्र प्रत्यक्षात योजना सामान्यापर्यंत पोहचत नाहीत. तसेच मतदार संघातील शिक्षण, रस्ते, विज असे मुलभुत प्रश्नांची सुद्धा सोडवणुक करणार की नाही याचा नाम मात्र उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला नाही. उलट श्रीरामाच्या जन्मभूमीतून आल्याचा उल्लेख करत एक प्रकारे उपस्थितांना भावनिक करत मताचा जोगवा मागण्याचे काम केल्याची चर्चा सभास्थळी होती, तर पाकिस्तान प्रश्न, कश्मिरातून कलम ३७० हटवले यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे अवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उपस्थितांचा भ्रमनिरास केला असल्याची चर्चा होत आहे.

...घेतला वसा टाकणार नाही.

मेघना बोर्डीकर म्हणाल्या,  जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी , आरोग्य आदी मूलभूत प्रश्नांना कायमचे दूर करण्यासाठी मी विधानसभा निवडणुकीत उभी आहे. द्या मला विश्वास, द्या मला वचन, आमीषाला बळी पडणार नाही. निवडून आल्यावर उतरणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. मतदार संघाच्या विकासासाठी  समर्पित होऊन काम करेन.  मग देणार ना खंबीर साथ, असे आवाहन मेघना बोर्डीकर यांनी केले.


महिलांनी फिरवली पाठ

भारतीय जनता पक्षाकडून जिंतुर-सेलू विधानसभा मतदार संघात मेघना साकोरे बोर्डीकर या महिला उमेदवार असुन सुद्धा सभेला महिला मतदारांची उपस्थिती नगण्य होती. महिलासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर पुरुषांना बसण्यासाठी पाचारण करण्यात आले.महिलांची जागा पुरुषांनी बळकावली होती. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची महाजनादेश यात्रेच्या सभेच्या वेळी महिलांची उपस्थित मोठ्या प्रमाणावर होती. मात्र उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगींच्या सभेला मात्र महिलांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

.....

No comments:

Post a comment