तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 November 2019

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1804 कोटींची आवश्यकता
:-- केंद्रीय पथकासमोर परिस्थितीचे सादरीकरण

:-- सोयाबीन, कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान

:- बुलडाण्यात पिकांचे सर्वाधिक नुकसान

अमरावती, दि. 22 : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे अमरावती विभागातील खरीप पिकांचे 72 टक्के नुकसान झाले आहे. यात सोयाबिन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांसह भाजीपाला, हळदी आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामा आणि शासनाने निर्धारीत केलेल्या निकषानुसार एकूण सुमारे एक हजार 804 कोटी रूपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याची माहिती विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केंद्रीय पाहणी पथकाचे सदस्य डॉ. आर. पी. सिंह यांना दिली.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शेतीतील परिस्थितीची केंद्राच्या पथकाकडून आज पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीपूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. आर. पी. सिंह यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी विभागातील नुकसानीची माहिती घेतली. बैठकीला विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे आदी उपस्थित होते. 
विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी केलेल्या सादरीकरणात नमूद माहितीनुसार विभागात खरीप हंगामातील लागवडीखालील 31 लाख 18 हजार 797 हेक्टर क्षेत्रापैकी 22 लाख 44 हजार 436 हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात सर्वाधिक सुमारे 91 टक्के नुकसान सोयाबीनचे झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात जवळपास पूर्णत: नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीचे 84 टक्के नुकसान झाले आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.  
विभागात कापसाचा पेरा सर्वाधिक आहे. बुलडाणा, अकोला जिल्ह्यात कापसाचे जवळपास संपूर्णत: नुकसान झाले आहे. वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मोठे नुकसान, तर यवतमाळात अंशत: नुकसान झाले आहे. विभागात तुरीचे किरकोळ नुकसान झाले आहे. भाजीपाला आणि हळदी पिकांचे 45 टक्के नुकसान झाले आहे. या पिकांचे अकोला जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. विभागातील चार हजार 32 हेक्टर संत्रा, चार हजार 464 हेक्टर इतर फळपिके असे एकूण आठ हजार 497 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांसाठी 18 हजार प्रतिहेक्टरप्रमाणे 15 कोटी 15 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची आवश्यकता भासणार आहे.
विभागाच्या पावसाच्या सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी ऑक्टोबर महिन्यात मासिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात सरासरी पावसाच्या दुप्पट पाऊस झाला आहे. ऐन पिक कापणीच्यावेळी आलेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत मिळावी, अशी अपेक्षा करण्यात आली. शासनाच्या निकषानुसार मदतीसाठी आवश्यक असलेल्या 1804 कोटी रूपयांपैकी 439 कोटी रूपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे.
या बैठकीनंतर पथक पाहणीसाठी रवाना झाले. 


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment