बीड (प्रतिनिधी) :-
गेल्या वर्षी कमी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना अद्यापही विमा न मिळाल्यामुळे आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांच्यासमवेत शेतकरी प्रतिनिधींची बैठक घेतली. २०१८-१९ मधील खरीप हंगामातील विम्याचा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. येत्या १४ ते १५ डिसेंबरपर्यंत शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ यामुळे मिळू शकणार आहे.
गेल्या वर्षीच्या अर्ज त्रुटींमुळे शेतकर्यांचा खरीपाचा विमा मिळाला नव्हता. वारंवार पूर्तता अर्ज केल्यानंतरही बीड जिल्ह्यातील काही शेतकर्यांना विमा मिळाला नाही व अद्यापही शेतकरी खरीपाच्या विम्यापासून वंचित आहेत. ही बाब जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी गांभीर्याने घेतली. त्या अनुषंगाने ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जोशी यांना बीड येथे त्यांच्यासमवेत बैठक घेतली. जे शेतकरी खरेच विम्यासाठी पात्र ठरतील अशा शेतकर्यांच्या खात्यावर १४ ते १५ डिसेंबरपर्यंत विम्याची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. या बैठकीला अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम यांच्यासह ओरिएन्टल इन्शूरन्स कंपनीचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.
No comments:
Post a Comment