तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 18 November 2019

पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांच्या सहकार्यातून झाला-एस.एम. देशमुख दै. मराठवाडा साथी कार्यालयात देशमुख यांचा सत्कारपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर राज्यभरातील पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी 12 वर्षापुर्वी सुरु केलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले असून राज्यातील पत्रकारांची एकसंघता हेच या यशाचे कारण आहे. मी केवळ निमित्तमात्र असून या कायद्यामुळे आता निर्भिड व प्रामाणिकपणे आपल्याला पत्रकारिता करता येणार आहे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले.
दै. मराठवाडा साथीच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करुन घेण्यात यश मिळाल्याबद्दल एस.एम. देशमुख यांचा आज सोमवारी विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, संपादक सतिश बियाणी तसेच मराठी पत्रकार परिषदेचे अनिल महाजन, अनिल वाघमारे, सय्यद शाकेर उपस्थित होते. यावेळी सतिश बियाणी यांनी एस.एम. देशमुख यांचा शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार केला.
आपल्या भाषणात देशमुख पुढे म्हणाले की, पत्रकार संरक्षण कायदा राज्य सरकारने करावा यासाठी आपण खूप मोठा संघर्ष केला आहे. लोकप्रतिनिधी आणि 95 टक्के पत्रकारांचे या कामासाठी सहकार्य झाले असून महाराष्ट्र हे देशातील असा कायदा करणारे पहिलेच राज्य असल्याचे देशमुख म्हणाले. महाराष्ट्रात कायदा मंजूर झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, केरळ व झारखंड अशा राज्यातूनही आता पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात कायदा लागू झाल्यानंतर आता असा कायदा देशभरातील सर्व पत्रकारांना मिळावा असा आपला संकल्प असून त्यासाठी पुढे काम करणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार संरक्षण कायदा नेमका कसा आहे? यावर बोलतांना देशमुख म्हणाले की, पत्रकारांना आता कायदेशीर संरक्षण मिळाले असून यापुढे जर पत्रकारांवर हल्ला झाला तर संबंधीत घटनेचा तपास पोलीस उपअधिक्षक स्तरावर होणार असून या संबंधीचा खटला थेट जिल्हा न्यायालयात चालणार आहे. तीन वर्ष कारावास व 50 हजार रुपये दंड या प्रकरणात आरोपीला होणार असून पत्रकारांनीही या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी असेही ते म्हणाले. दैनिक कार्यालय, वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे याची मोडतोड झाल्यास नुकसान भरपाईचीही तरतुद या कायद्यात असून जखमी पत्रकारांचा उपचाराचाही खर्च हल्लेखोरांना द्यावा लागेल एवढा कडक कायदा असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, आणिबाणीच्या परिस्थितीत पत्रकारांसाठी राज्यभरात पत्रकार कल्याण निधी उभा करण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. याच कार्यक्रमात पत्रकार संरक्षण कायद्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपोषणात सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांचा एस.एम. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी तत्कालीन विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हा ठराव सभागृहात चर्चेला आणण्यासाठी स्वीय सहाय्यक प्रशांत भा. जोशी यांनी सहकार्य केले असून त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे, अनिल महाजन यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत ओमप्रकाश बुरांडे, दत्तात्रय काळे, धनंजय आरबुने यांनी केले. कार्यक्रमास  संपादक प्रकाश सुर्यकर,प्रकाश चव्हाण, संजय खाकरे, धिरज जंगले, महादेव गित्ते, मोहन व्हावळे, शंकर इंगळे, प्रा. प्रविण फुटके, भगीरथ बद्दर, बालकिशन सोनी, बालासाहेब फड, संजीब रॉय, सुकेशनी नाईकवाडे, माणिक कोकाटे, शेख बाबा, अनिरुद्ध जोशी, प्रा. रविंद्र जोशी, आत्मलिंग शेटे, दिलीप जोशी, रामप्रसाद शर्मा,  आढाव, प्रा. राजू कोकलगावे, जगदीश शिंदे, आनंत गित्ते, प्रकाश वर्मा, महादेश शिंदे, संतोष जुजगर आदींसह अनेक पत्रकार उपस्थित होते. संचलन दै. मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत प्र. जोशी तर आभार दत्तात्रय काळे यांनी केले.

No comments:

Post a comment