तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 November 2019

दिवस रात्र सामन्यात गुलाबी रंगाचा चेंडूच का ?


             २२ नोव्हेंबर २०१९ पासून कोलकात्याच्या ईडन गार्डनवर भारत व बांगलादेश यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची विशेष चर्चा करण्याचे कारण म्हणजे हा सामना पारंपारीक कसोटी सामन्यात वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूवर न खेळता गुलाबी रंगाच्या चेंडूवर खेळला जाणार आहे. विशेष म्हणजे हा सामना दिवस रात्र पद्धतीने खेळला जाणार आहे. तसे बघाल तर हे दोन्ही संघ प्रथमच या प्रकारचा कसोटी सामना खेळत आहे, परंतु भारत या प्रकारच्या क्रिकेटला सुरूवातीपासून टाळाटाळ करत होता. अखेर काळाच्या ओघात कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्याचा उद्देशाने भारतानेही हा बदल स्विकारला आहे. त्यामुळेच या सामन्याला ऐतिहासीक महत्व प्राप्त झाले आहे.
              सन १८७७ मध्ये सुरू झालेले लाल चेंडूच्या खेळाचे हे क्रिकेट अनेक स्थित्यंतरे घडत गुलाबी रंगाच्या चेंडूपर्यंत पोहोचले. साडेतीन ते चार एकरचे भव्य मैदान, त्या मैदानात एका वेळेस तेरा खेळाडू ( ११ क्षेत्ररक्षक +  २ फलंदाज ) व दोन पंच, ६ स्टंप्स, दोन बॅट हजर असले तरी सर्वांच्या नजरा असतात त्या गोल गरगरीत चेंडूवर ! मग त्याचा रंग कुठलाही असो !! आपल्याला माहितीच आहे २७ नोव्हेंबर २०१५ ला ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड संघ प्रथमच या प्रकारच्या क्रिकेटमध्ये कसोटी खेळले. त्यासह अकरा कसोटी आजवर खेळल्या आहेत. या सामन्याच्या रूपाने बारावा कसोटी सामना आपल्यासमोर होऊ घातला आहे.
                 ऑस्ट्रेलियास्थित कुकाबुरा कंपनीने जगातला पहिला गुलाबी रंगाचा चेंडू बनविला. अनेक वर्षाच्या चाचण्या व तपासण्यानंतर कुकाबुरा कंपनी एक चांगला गुलाबी रंगाचा चेंडू बनवण्यात यशस्वी झाली. अनेक सामन्यात प्रयोग करून झाल्यावर दिवसरात्र कसोटीमध्ये गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला. त्यानंतर जवळ जवळ सर्वच संघ कसोटीचा हा प्रकार स्विकारण्यास राजी झाले.
                पारंपारीक कसोटी सामने पांढऱ्या शुभ पोशाखात व लाल चेंडूवर खेळले जाते. वनडे व टि २० सामने रंगीत पोशाखात सफेद चेंडूवर खेळले जाते. बहुतेक सफेद चेंडूचे सामनेही दिवस रात्र खेळविले जातात. मग दिवस रात्र कसोटी सफेद चेंडूवर का खेळविली जात नाही ? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्याचे कारण असे की, गुलाबी रंगाचा चेंडू तयार करण्यापूर्वी कुकाबुरा कंपनीने दिवस रात्र सामन्यांसाठी पोषक ठरेल असे अनेक रंगांचे चेंडू बनवून बघितले. त्यामध्ये प्रामुख्याने पिवळ्या व नारंगी रंगाचा समावेश होता. परंतु हे रंग असलेले चेंडू शोधण्यात मैदानातील कॅमेरे त्याचे संचलन करणाऱ्या कॅमेरामन्सला अडचणीचे ठरू लागले. शिवाय ते चेंंडू दिसायला खेळाडूंनाही त्रासदायक ठरत होते. त्यानंतर सर्वसहमतीने गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यावर शिक्कामोर्तब झाले.
                वनडेमध्ये वापरला जाणारा सफेद चेंडूच दिवस रात्र सामन्यात का वापरला जात नाही ? असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागला. त्यावरही संशोधन केल्यावर लक्षात आली. वन डे सामने कमाल ५० षटकांचे असतात. त्यामध्येही हे सफेद चेंडू मैदानातील गवतावर पडून- पडून भुरकट होऊ लागले, मळके दिसू लागले. त्यामुळे तेथेही एका डावात दोन चेंडूंचा वापर केला जाऊ लागला. जेणे करून संपूर्ण डावात चेंडू खेळाडू, पंच, स्कोअरर, कॅमेरामन, व प्रेक्षक यांना दिसायला सुलभ जावे. त्यातच कसोटीत एका डावात ८o षटके झाल्याशिवाय नवीन चेंडू घेता येत नाही व दोन्ही एंडकडून एकच चेंडू वापरला जातो. यामुळे सफेद चेंडू वापरून वापरून अतिशय भुरकट होऊन संबधीतांना दिसणे अथवा ओळखणे मुश्किल असल्याने मोठया प्रयोगानंतर डे नाईट कसोटीसाठी गुलाबी चेंडूची निवड करण्यात आली. डे नाईट वनडे रंगीत कपड्यात खेळले जातात. कसोटी क्रिकेट सफेद पोशाखात खेळले जाते. कसोटीची पारंपारकीता जपण्यासाठी डे नाईट कसोटी सामने ही पांढऱ्या पोशाखातच खेळवलं जातं.
               या सर्व बाबींचा विचार करून कसोटी क्रिकेटचे कमी झालेले प्रेक्षक पुुन्हा वळविण्यासाठी आयसीसीने दिवस रात्र कसोटी खेळविण्याचा निर्णय घेतला व मैदानातील प्रत्येक घटकाची गरज लक्षात ठेवूून गुलाबी रंगाचा चेंडूच वापरात येऊ लागला.

लेखक : - दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment