तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 November 2019

शुन्यावर बाद होण्यातही कोहलीची विक्रमाकडे वाटचाल


            १४ नोव्हेंबा २०१९ पासून इंदोरच्या होळकर स्टेडीयमवर भारत व बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरु झाला. या मैदानावरील हा दुसराच कसोटी सामना आहे. पहिला सामना न्यूझिलंडविरूध्द ८ ते ११ ऑक्टोबर २०१६ दरम्यान इंदोरला झाला होता. त्यामध्ये भारताने बाजी मारली होती.
           पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर ढिसाळ क्षेत्ररक्षणानंतरही बांगलादेशचा संघ १५० धावांवरच गडगडला. प्रत्युत्तरात रोहीत शर्माच्या अपयशानंतरही पुजारा व अग्रवालने भारताची नैया दिवसाअखेर सुखरूप पार केली. दुसऱ्या दिवशी पुजारा झटपट परतल्यानंतर जगातील उत्कृष्ठ फलंदाजात गणला जाणारा भारतीय कर्णधार विराट कोहली खेळण्यास मैदानात पोहोचला.
            अनेक विक्रम स्वतःच्या नावे केलेल्या कोहलीकडून प्रेक्षकांच्या मोठया अपेक्षा होत्या. कारण यापूर्वी इंदोरच्या न्यूझीलंडविरूध्दच्या कसोटीत २११ धावांची खेळी कोहलीने साकारली होती. यावेळीही कोहलीकडून प्रेक्षकांच्या अशाच अपेक्षा होत्या. परंतु या वेळी नियतीच्या मनात वेगळीच चाल होती.
           बांगलादेशचा जलदगती गोलंदाज अबू जायेदच्या झपकन आत आलेल्या चेंडूने कोहलीच्या पॅडचा स्टंप्ससमोर वेध घेतला. बांगलादेशच्या खेळाडूंचे जोरदार अपिल पंचांनी फेटाळताच बांगलादेशी कर्णधाराने क्षणाचाही विलंब न लावता रिव्हयू घेतला. तिसऱ्या पंचानी तपासणी करून कोहलीला बाद ठरविले. बाद होण्यापूर्वी कोहली एकच चेंडू खेळला होता.
              उपस्थित प्रेक्षकांना निराश करत कोहली तंबूत परतला. कोहली भले या सामन्यात शुन्यावर बाद झाला. परंतु दर सामन्यात काही तरी विक्रम करण्यात पटाईत असलेला कोहली या वेळी जरा आकड्यांच्या वेगळ्याच जंजाळात सापडला. कसोटी कारकिर्दीत शुन्यावर बाद होण्याची ही त्याची दहावी वेळ. यापैकी ४ वेळा गोल्डन डक म्हणजे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दोन वेळा सिल्व्हर डक म्हणजे दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला.एक वेळा चौथ्या तर एकदा ११ व्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला. दोनदा १५ पेक्षा अधिक चेंडू खेळनही खाते न उघडताच परतला. त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीही निरनिराळ्या आहेत. त्यामध्ये सहा वेळा झेलबाद, तीन वेळा पायचीत तर एकदा त्रिफळाचित झाला आहे.
               भारतीय खेळपट्यांवर आतापर्यंत कोहली तीन वेळा शुन्यावर बाद झाला आहे. सर्वप्रथम सन २०१७ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुणे कसोटीत मिचेल स्टार्कच्या चेंडूवर शुन्यावर बाद झाला होता. सन २०१७ च्या सत्रातच पुन्हा एकदा तो शुन्याचा धनी बनला. सदर सामना कोलकात्यात श्रीलंकेविरुद्ध झाला. होता. त्यावेळी सुरंगा लकमल त्याचा कर्दनकाळ ठरला होता, आणि आता २०१९ ला इंदोरमध्ये बांगलादेशच्या अबू जायेदने त्याचा काटा शुन्यावरच काटा केला.
            कसोटीतील एका डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक झळकावणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. १९ नोव्हेंबर २०१७ रोजी कोलकाता कसोटीत श्रीलंकेविरूध्द पहिल्या डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात १०४ धावा ठोकल्या होत्या.
                एक कर्णधार म्हणून सर्वाधीक शुन्यावर बाद होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या अनोख्या क्लबमध्येही तो सामील झाला आहे. आतापर्यंत तो सहा वेळा कर्णधार असताना शुन्यावर बाद झाला आहे. शुन्यावर सर्वाधिक आठ बाद होण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असून दुसऱ्या स्थानावर असलेले मन्सूर अली खान ७ वेळा शुन्याची शिकार बनले. तर कपिलदेव सहा वेळा शुन्याच्या फेऱ्यात अडकला. आता कोहलीने कपिललाही गाठले आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याचा विक्रमही कोहली त्याच्या कारकिर्दीत गाठतो का ? हा मोठा औत्सुक्यचा विषय असणार आहे.

लेखक : - दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment