तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

टि २० ने ओलांडला हजार सामन्यांचा उंबरठा

               सन २००५ मध्ये पहिला अधिकृत टि-२० सामना खेळल्या नंतर अवघ्या चौदा वर्षात या क्रिकेटच्या धाकटया अपत्याने लोकप्रियतेची गगनभरारी घेत एक हजार सामन्यांचा मैलाचा दगड पार केला आहे. पहिला टि २० सामना न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला गेला होता. या दरम्यान या स्पर्धेचे ६ विश्वकरंडकही झाले. क्रिकेटच्या या छोट्या अविष्काराने फलंदाजीत अनेक प्रकारचे फटकेही विकसीत होताना पाहीले, गोलंदाजांकडून विविध क्लृप्त्या लढवतानाही दिसल्या. ना ना प्रकारचेही मनोरंजक प्रसंग या खेळात घडले. विक्रम - पराक्रमाने खेळाडूही धन्य झाले. 
               नुकताच ३ नोव्हेंबर २०१९ ला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडीयममध्ये भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान तिन सामन्यांच्या मालिकेतला पहिला टि २o सामना खेळला गेला. तो जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील एक हजारावा अधिकृत टि २o सामना खेळला गेला. 
                
                टि २० क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख देशांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास पाकिस्तान सर्वात वरच्या स्थानावर असल्याचे दिसते. आतापर्यंत पाकिस्तान १४७ सामने खेळले असून सर्वाधीक ९o विजय त्यांच्या नावावर असून ५३ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. दुसऱ्या स्थानावर भारत असून भारताने १२१ सामन्यात ७४ विजय व ४३ पराभव चाखले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ११५ सामने खेळणारा दक्षिण असून ६८ विजय व ४५ पराभव त्यांच्या नावावर आहेत. ऑस्ट्रेलिया चौथ्या नंबरवर असून ६३ विजय व ५२ पराभव १२० सामन्यात त्यांच्या वाटयाला आले. न्यूझिलंड १२३ सामने खेळल्यानंतर ६० विजय व ५५ पराभव पचवून पाचव्या क्रमाकांवर आहे. श्रीलंकेनेही १२३ सामने खेळले मात्र ५९ विजय ६१ पराभव त्यांना सहाव्या स्थानावर ढकलण्यास कारण ठरले. सातव्या स्तानावर इंग्लंड आहे. १११ सामन्यात ५५ विजय व ५१ पराभव त्यांना झेलावे लागले.आठव्या क्रमांकावरील आफगाणिस्तानला ७५ सामन्यात ५१ विजय व २४ पराभवांचे तोंड पहावे लागले. विंडीजचा संघ अफगाणिस्तान पेक्षा जास्त सामने खेळला परतुं विजय मिळविण्यात त्यांच्यापेक्षा मागे राहीला. विंडीजचे ११३ सामन्यात ४९ विजय व ५७ पराभव आहेत. आयर्लंड ९२ सामन्यात ४० विजय व ४५ पराभव झेलून दहाव्या स्थानी आहेत. अकराव्या स्थानावरील नेदरलँड ७५ सामन्यात ३९ विजय व ३२ पराभवांसह ११ व्या स्थानी आहेत. तर बांगलादेशचा संघ बाराव्या स्थानी आहे. त्यांच्या खात्यात ९० सामन्यात ३० विजय व ५८ पराभव जमा आहेत. 
                सर्वाधीक बळी घेणाऱ्या पहिला क्रमांक लागतो श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाचा. त्याने ७९ सामन्यात १०६ बळी मिळविले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ९८ बळी मिळवून पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी आहे. बांगलादेशचा साकीब अल हसन ९२ बळी मिळवून तिसऱ्या स्थानी आहे. आफ्रिदी निवृत्त झाला तर साकीब मॅच फिक्सिंगमुळे बंदिवासात आहे. 
                 टि २० मध्ये सर्वाधीक धावा व शतक करणाऱ्या फलंदाजात रोहित शर्मा आघाडीवर असून ९९ सामन्यात ४ शतकांसह २४५२ धावा त्याने जमविल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारताचाच विराट २४५० धावांसह आहे, तर न्यूझिलंडचा मार्टीन गप्टील तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे २३२६ धावा आहेत. 
                 टि २० तील रंगतदार कामगिरी व रोमहर्षकता लक्षात घेता भविष्यात आणखीही देश याकडे आकर्षित होतील व संपूर्ण जगात लोकप्रियतेचा कळस गाठेल. यावर कुणी आश्चर्य व्यक्त करणार नाही.


लेखक : - 

दत्ता विघावे  
क्रिकेट समिक्षक. 
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,  

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल 

 प्रतिनिधी भारत. 

Email:   dattavighave@gmail.com

No comments:

Post a Comment