तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 November 2019

इतिहासाच्या पानात डोकावताना "पहिली दिवस रात्र कसोटी"


       २२ नोव्हेंबर २०१९ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाईल. याचे कारण सर्वांना ज्ञात आहे. याच दिवशी भारत आपला पहिला गुलाबी चेंडूने खेळला जाणारा दिवस रात्र कसोटी सामना खेळल्याची नोंद क्रिकेटच्या ज्ञानकोषात पहायला मिळेल. याच बरोबर भारताशी दोन हात करावे लागलेला बांगलादेशचा संघही त्यांचा या प्रकारचा पहिलाच कसोटी सामना खेळत असल्याने क्रिकेट रसिकांसाठी तो दुग्धशर्करा योगच ठरला. त्याचबरोबर कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमलाही ऐतिहासीक महत्व प्राप्त झाले आहे.
            सन १८७७ ते २०१५ या कालखंडात टेस्ट क्रिकेट सुर्याच्या लख्ख प्रकाशात लाल चेंडूने खेळले जायचे. परंतु प्रेक्षकांचा आटलेला लोंढा पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळविण्यासाठी आयसीसीने दिवस रात्र कसोटी खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु भारत या प्रकाराचा स्विकार करण्यास टाळाटाळ करत होता. परंतु सौरव गांगुलीने बीसीसीआयची कमान सांभाळताच बीसीसीआयच्या जुन्या अधिकाऱ्यांचे विचार गळून पडले व भारताने नव्या प्रणालीचा अंगिकार केला.
                २७ नोव्हेंबर १९७९ रोजी एक दिवसीय सामन्यांचा पहिला दिवस रात्र सामना खेळला. त्यानंतर डे नाईट कसोटी सामना व्हायला ३६ वर्ष लागले.
               सन २०१५ ला अॅडलेड येथे न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस रात्र कसोटीतील काही  सामन्यातील ऐतिहासीक क्षणचित्रे आपणासाठी सादर करत आहोत.
               गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीचा पहिला चेंडू खेळण्याचा मान न्यूझिलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टील याला मिळाला.गप्टीलने पहिला चेंडू खेळला, पहिली धावही काढली व पहिला बाद होणारा खेळाडूही तोच ठरला.
               न्यूझिलंडचा मधल्या फळीतला फलंदाज रॉस टेलर डे नाईट कसोटीत झेलबाद होणारा पहिला फलंदाज असून त्याला झेलबाद करणारा ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक पीटर नेवील पहिला यष्टीरक्षक - क्षेत्ररक्षक ठरला. न्यूझिलंडचा मिचेल सँटनर त्रिफळाबाद होणारा हा पहिला फलंदाज ठरला. न्यूझिलंडचा दुसरा सलामीवीर टॉम लॅथम गुलाबी चेंडूवर चौकार मारणारा व अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.डे नाईट कसोटीत षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला न्यूझिलंडचा दहाव्या क्रमांकावरील टिम साऊदी.
                 दिवसरात्र कसोटीत धावबाद होणारा पहिला फलंदाज ठरला ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श व धावबाद करणारा पहिला क्षेत्ररक्षक ठरला न्यूझिलंडचा ब्रेंडन मॅकलम. दिवस रात्र कसोटीत अर्धशतक करणारा पहिला कर्णधार ठरला ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ. स्मिथने ५३ धावा काढल्या होत्या. स्टीव्हन स्मिथ व ब्रेंडन मॅकलम हे गुलाबी चेंडूच्या खेळातले दोन्ही संघांचे कर्णधार होते.
ऑस्ट्रेलियाचा पीटर सिडल शुन्यावर बाद होणारा पहिला फलंदाज ठरला. पहिला सामनावीर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जोश हेजलवूड ठरला. त्याने सामन्यात नऊ बळी घेतले.
                 या सामन्यातील धावफलक : -
न्यूझिलंड २०२ व २०८ तर ऑस्ट्रेलिया २२४ व ७ बाद १८७. कांगारू ३ गडयांनी विजयी ठरले.
अशी होती जगातील गुलाबी चेंडूवरील पहिली दिवस रात्र कसोटी.
         लेखक : - दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a comment