तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 6 November 2019

प्रस्ताव येणार नाही आणि पाठवणार नाही, आधी ठरल्याप्रमाणे कराः संजय राऊत


बाळू राऊत प्रतिनिधी 
मुंबई,दि.७ : राज्यातल्या सत्ता स्थापनेचा पेच सुटण्याचं काही नावं घेत नाही आहे. भाजप शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचं वृत्त येताच, पुन्हा एकदा शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम भूमिका घेतली आहे. आज सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राऊत यांनी शिवसेना कोणत्याही प्रकारची तडजोडीला तयार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

तसंच मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचंही राऊत यांनी म्हटलं. राज्यात शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. मंगळवारी शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यात गेले होते. तसंच आदित्य ठाकरेंनी देखील ओला दुष्काळाचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आणि कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पाहत आहेत. काहीही झालं तरीही चालेल मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

तसंच आता नव्यानं काय सांगायचं? कुठलाही नवा प्रस्ताव नाही जे आधी ठरलंय तेच शिवसेनेचं म्हणणं आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी शिवसेनेनं आतापर्यंत घेतलेली भूमिका पुन्हा सांगितली. भाजपकडून कोणत्याही प्रकारचा नवा प्रस्ताव येणार नाही किंवा आणि त्यांना नवा प्रस्ताव पाठवणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी जे ठरलंय तेच होणार, ठरल्याप्रमाणे करा, असं स्पष्ट करत ज्या गोष्टींवर आधीच सहमती झाली आहे त्याच गोष्टी पुढे घेऊन चला. हाच एकमेव प्रस्ताव. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यातल्या राष्ट्रपती राजवटीला आम्ही जबाबदार नसणार 

राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. याबाबत राऊत यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की, भारतीय जनता पक्षानं दिलेला शब्द पाळला नाही आणि जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, तर या स्थितीला शिवसेना जबाबदार नसेल. 

जर कोणी राज्यावर राष्ट्रपती राजवट विनाकारण थोपवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो महाराष्ट्रातील जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान असेल. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असेल, महाराजांच्या महाराष्ट्रावर झालेला अन्याय असेल आणि तो अधर्माचा विजय ठरेल, असं राऊत म्हणालेत. तसंच राष्ट्रवादीनं सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला आहे का यावर बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही त्यासंदर्भात बघून घेऊ काय करायचे ते.

No comments:

Post a comment