तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 7 November 2019

तलाठ्याचे निवासस्थान, सज्जा इमारत बनली जनावरांचा गोठा
परळी तालुक्यातील तळेगाव येथील प्रकार; तलाठी परळी शहरातून हाकतात कारभार


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील तळेगाव येथील तलाठी सज्जाच्या इमारतीसह निवासस्थानाची दुरवस्था झाली आहे. कार्यालयासह निवासस्थानास अक्षरशः जनावरांचा गोठा बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थातून संताप व्यक्त होत असून जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सतिष भुसेवाड हे तळेगाव येथील सज्जाचे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शासनाकडून निवासस्थान व सज्जा इमारत देण्यात आलेली आहे. ते गेल्या काही महिन्यापासून सज्जाकडे फिरकलेच नसून कारभार परळी शहरातूनच हाकतात, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यांना निवासस्थानासह सज्जा इमारतीत जनावरे बांधली जात असल्याची माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. तसेच, जनावरे बांधणार्‍या ग्रामस्थांना न रोखल्यामुळे निवासस्थानासह सज्जा इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. दरम्यान, मुख्यालयी न राहणार्‍या तलाठी सतिष भुसेवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. याबाबत भुसेवाड यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.


जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशास केराची टोपली

तलाठ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी राहण्याचे राहण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानाही सज्जाचे तलाठी भुसेवाड हे परळी शहरातूनच कारभार हाकतात. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ते सज्जाकडे गेल्या अनेक महिन्यापासून फिरकले देखील नाहीत. त्यामुळे भुसेवाड यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.


तलाठी हे सज्जाकडे फिरकतही नाहीत. कधीतरी पंचनामा करण्यासाठी गावात येत असतात. त्यांचे परळी बसस्थानकाकडून एक किलोमीटरवर खाजगी खोलीत कार्यालय आहे. तेथेही ते हजर नसतात. त्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय होते. त्यांनी सज्जावर उपस्थित राहावे. सज्जाचीही दुरवस्था झालेली आहे.
-भागवत मुंडे, ग्रामस्थ, तळेगाव


परळी वैजनाथ : तळेगाव (ता.परळी) येथील तलाठी सज्जासमोरील फलकासह इमारत, निवास्थानाची दुरवस्था झाली आहे.

No comments:

Post a Comment