तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 3 November 2019

कोलकात्याचे ईडन गार्डन बनले ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार                   कोलकात्याच्या ऐतिहासीक ईडन गार्डन स्टेडियमवर येत्या २२ नोव्हेंबर पासून भारत व बांगलादेश यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना होत असून तो भारताचा व भारतात होणारा पहिला अधिकृत दिवसरात्र कसोटी सामना ठरणार आहे. 

                  हाच ऐतिहासिक कसोटी सामना बांगलादेशचाही पहिलाच डे नाईट कसोटी ठरणार असल्याने दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या विशेष घटनेसह कोलकात्याचं हे भव्यदिव्य स्टेडीयम ऐतिहासीक सामने, नाटयमय खेळ, प्रेक्षकांची हुल्लडबाजी, जाळपोळ यांचेही साक्षीदार राहीले आहे. अशाच काही शहारे आणणाऱ्या प्रसंगानी कधी या स्टेडीयमची शोभा वाढली तर कधी प्रतिमा मलिन झाली. अशाच काही थरारक प्रसंगांची माहिती आपण या लेखात घेऊ या.

                 सन १९३३-३४ च्या सत्रात भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान खेळलेला कसोटी सामना ईडन गार्डनवरील पहिला अधिकृत कसोटी सामना होता.  त्यानंतर ८७ वर्षांनी डे नाईट सामन्यांच्या भारतातील शुभारंभाची लढत येथे होत आहे. या सामन्याबरोबरच ईडन गार्डन डे नाईट कसोटी आयोजन करणारे आशियातील पहिले स्टेडियम बनेल.  सन १९८७ मध्ये एकदिवशीय सामन्यांची स्पर्धा प्रथमच इंग्लंड बाहेर आयोजित करण्यात आली होती. भारत व पाकिस्तानने आयोजन केलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्याचा मान याच मैदानाला मिळाला होता.  प्रेक्षकांची सर्वाधिक आसन क्षमता असलेले हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्टेडीयम आहे.

                सन १९९९ मध्ये येथेच आशियाई टेस्ट चॅम्पीयनशीपचा भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना येथेच झाला होता. सन १९९६ विश्वचषकाचा उपांत्य सामना येथेच झाला. मात्र या सामन्यातील भारतीय फलंदाजांच्या हाराकिरीला वैतागून प्रेक्षकांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळेच तो सामना जास्त लक्षात राहतो. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने २५१ धावा बनविल्या. विजयी लक्षाचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरच्या ६५ धावांच्या बळावर भारताने १ बाद ९८ अशी मजबूत सुरुवात केली. परंतु १२० धावांपर्यंत पोहोचता पोहोचता भारताचे ८ शिलेदार धारातीर्थी पडले. यात श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या कर्तबगारीपेक्षा भारतीय फलंदाजांची बेफिकीरीच जास्त होती, त्यामुळे चिडलेल्या प्रेक्षकांनी आपल्या रागाला वाट मोकळी करुन देत मैदानात मोकळ्या बाटल्या, पेटलेले कागदांचे बोळे फेकायला सुरुवात केली. त्यानंतर पंचांनी सामनाच रद्द करून श्रीलंकेला फायनलचे तिकीट देऊन टाकले. यावेळी श्रीलंकेचे खेळाडू विजयोत्सव साजरा करत असताना नाबाद फलंदाज विनोद कांबळी ढसाढसा रडत होता. या रितीने या मैदानाने जीवन रहाटीचे अनेक प्रसंग या सामन्या निमित्ताने एकाच वेळी अनुभवले.

                   सन २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द भारत पहिल्या डावातील गचाळ फलंदाजीनंतर फॉलोऑन खेळत असताना व्हीव्हीएस लक्ष्मण २८१ व राहुल द्रविड १८० यांच्या ४७६ धावांच्या भागिदारीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला चकीत केले. याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारतातर्फे कसोटीतील पहिली हॅट्रीक घेण्याचा मान हरभजन सिंगला मिळाला.

                   हे व असे अनेक किस्से या मैदानाने बघितले आहे. असाच नवा अनुभव डे नाईट कसोटीच्या रुपात ईडन गार्डन अनुभवणार आहे. अशा या ऐतिहासीक मैदानाला मानाचा मुजरा व त्रिवार सलाम !!!


लेखक : -

दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल

 प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment