तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 26 November 2019

महिला महाविद्यालयात संविधानदिन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधानदिनाचे औचित्य साधून  संस्थेचे अध्यक्ष मा.संजयजी देशमुख ,कोषाध्यक्ष मा.प्रा.प्रसादजी देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.आर. जे.परळीकरमॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन केले . त्यानंतर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले होते.व्याख्यानासाठी वैद्यनाथ महाविद्यालयातील राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा.डी.के.आंधळेसर व अांतरराष्ट्रीय वैदिक विद्वान् आचार्य आनंद पुरुषार्थी व प्रा.डॉ.विनोद जगतकर यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन  लाभले. सर्वप्रथम राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्राध्यापक डॉ.पी.व्ही. गुट्टे यांनी  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले . यानंतर प्रा.आंधळेसरांनी संविधाननिर्मितीचा संपूर्ण इतिहासाचा उलगडा करुन दाखविला .त्याचबरोबर संविधानामधील कलमे त्यातील परिशिष्टे आदींचा सविस्तर अशा प्रकारचा परिचय विद्यार्थिनींना करून दिला. पुण्य न करता पुण्याच्या फळाची इच्छा धरणे आणि पाप करूनही पापाच्या  फळाची इच्छा न करणे , हा मनुष्य स्वभाव पाहता त्याला काही नीतिनियमांची गरज असते, ही गरज ओळखून प्राचीन काळामध्ये दंडविधान निर्माण केले गेले . इत्यादी प्राचीन राज्यशासनाची सविस्तर ओळख करून देऊन त्यांनी सध्याच्या संविधानाचाही विस्तृत परिचय करून दिला. प्राचीन काळातील शासन पद्धतीच्या लेखाजोखा मांडताना त्यांनी अनेक संस्कृत सुभाषितांचा दाखलाही दिला. अतिशय अभ्यासपूर्ण अशा त्यांच्या या व्याख्यानामध्ये त्यांनी संविधानाचे अनेक पैलू उलगडून दाखविले संविधान निर्मितीचा इतिहासही याप्रसंगी त्यांनी सविस्तरपणे मांडला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैदिक विद्वान आचार्य आनंद पुरुषार्थी यांनी जवळपास साडेबाराशे वर्षापर्यंत वेगवेगळ्या राजवटीच्या आधिपत्याखाली असलेल्या या भारतदेशाने पहिल्यांदा जेव्हा स्वातंत्र्याचा मोकळा श्वास अनुभवला तेव्हा या देशाचे संचालन करण्यासाठी एका संविधानाची अत्यंत आवश्यकता होती आणि ती आवश्यकता आजच्याच दिवशी इसवी सन 1949 रोजी पूर्णत्वाला आली इत्यादी सविस्तर प्रतिपादन केले . देश चालविण्यासाठी जसे संविधान असते तसे संपूर्ण सृष्टी चालविण्यासाठी परमेश्वराचे विधान असते असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. या संपूर्ण विश्वाचे संचालन करणारा परमपिता परमेश्वर हा प्रत्येक ठिकाणी आहे , कणाकणात आहे ही जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्तीने नेहमी सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ,असे विचार  त्यांनी मांडले. याच कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विनोद जगतकर यांनी संविधान निर्मितीच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि या संविधानाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी आचरण केले पाहिजे असे प्रतिपादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ.पी. व्ही गुट्टे यांनी प्रस्ताविक मांडले, सूत्रसंचालन प्रा. प्रवीण फुटके यांनी केले आणि सहकार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ. आर .एल. जोशी यांच्या वतीने आभार मानण्यात आले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींची उत्साहपूर्ण अशी उपस्थिती होती.

No comments:

Post a comment