तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 8 November 2019

रोहीत शर्माच्या कामगिरीला खराखुरा सलाम !


               भारताच्या टि-२० संघाचा हंगामी कर्णधार रोहीत शर्माने बांगलादेशविरुद्ध तीन टि २० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेहमीप्रमाणे आघाडीवर राहून संघाचा मोर्चा सांभाळलाच नाही तर आपल्या शंभराव्या टि २० आंतरराष्ट्रीय सामन्याला यादगार बनवत एक धुवाँवार खेळी साकारून संघाला विजयी केलेच शिवाय अनेक विक्रमांनाही आपल्याकडे आकृष्ट केले.
                  बांगलादेशविरुध्दच्या दिल्लीतील पहिल्या सामन्यात रोहितने भारताकडून सर्वाधिक टि २० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा माजी कर्णधार एम एस धोनीचा ९८ सामन्यांचा विक्रम मागे टाकून पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या ९९ सामन्यांशी बरोबरी केली होती. नंतर राजकोटला स्वतःचा १०० वा टि सामना खेळून १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातला केवळ दुसरा खेळाडू बनला. त्याच्या पेक्षा अधिक सामने फक्त पाकिस्तानचा शोएब मलिक खेळला आहे. शोएबच्या नावे १११ सामने असून रोहीत लवकरच त्यालाही मागे टाकू शकतो.
                 इतकेच नाही तर भारताकडून प्रथम शंभर कसोटी खेळण्याचा पराक्रम करणाऱ्या सुनिल गावस्कर व प्रथम १०० वनडे खेळणाऱ्या कपिलदेव यांच्या पंक्तीत जाऊन बसला. सुनिल गावस्करने सन १९८४ मध्ये तर कपिल देवने सन १९८७ मध्ये ही कामगिरी केली होती.
                 एकदंर टि २० कारकिर्दीतील मान्यताप्राप्त ३२० वा सामना तो या सामन्याच्या रूपाने खेळला. यापूर्वी सर्वाधिक ३१९ सामने खेळण्याचा भारतीय विक्रम सुरेश रैनाच्या नावे होता. तो विक्रम आता रोहीतच्या नावावर लागला.
                 
                  नियमीत कर्णधार विराट कोहलीच्या गैरहजेरीत बांगलादेश विरुध्द नेतृत्व करत असलेला रोहीत सफेद चेंडूच्या खेळातील भारताचा उपकर्णधार आहे. १९ सप्टेंबर २००७ रोजी टि २० विश्वचषकात डरबन येथे इंग्लंडविरुद्ध आपला पहिला टि २० सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळालीच नाही. परंतु तो सामना युवराजने ब्रॉडला मारलेल्या सलग  सहा षटकारांनी अजरामर राहीला.३२ वर्षीय रोहीत टि २० च्या १०० आंतरराष्ट्रीय सामन्यात २५३७ धावा काढून सर्वाधीक धावा करणारा खेळाडू बनला आहे. शिवाय सर्वाधिक ४ शतकेही त्याच्या नावावर आहे. त्याचबरोबर १७ अर्धशतकेही त्याच्या नावावर आहेत. याबाबत विराट कोहली २२ अर्धशतके ठोकून आघाडीवर आहे. परंतु त्याचा फॉर्म बघता हा विक्रम सुध्दा तो आपल्याकडे खेचू शकतो.
                  हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला संघाची रोहीत शर्मा सारखी एक महत्वाची खेळाडू आहे. भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टि २० सामने खेळणारी क्रिकेटपटू आहे. तर रोहित भारतीय पुरुष संघाकडून सर्वाधिक टि २० सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे.योगायोगाची गोष्ट अशी की याव्यतिरिक्त रोहित आणि कौरमध्ये आणखीही खास साम्य आहेत. रोहित हा भारताकडून  टि २० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पुरुष क्रिकेटपटू आहे. तर कौरनेही भारतीय महिला संघाकडून मध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. रोहितने १०९ षटकार मारले आहेत. तर कौरने ५६ षटकार मारले आहेत. तसेच भारताकडून कर्णधार म्हणून टि २० मध्ये शतकी खेळी करण्याचा विक्रमही रोहित आणि हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून टि २० मध्ये एक शतक केले आहे. तर रोहितने भारतीय पुरुष संघाचा कर्णधार म्हणून टि २० मध्ये दोन शतके केली आहेत.
                 भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीलाही न जमलेले कारनामे रोहीतने केल्यामुळे त्याची कामगिरी खरोखर नजरेत भरणारी आहे. त्यामुळे रोहीत शर्माला खरोखर सलाम ठोकल्यायास वावगे ठरणार नाही.

लेखक : -दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत.Email:  dattavighave@gmail.comमोबाईल. ९०९६३७२०८२.

No comments:

Post a Comment