तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 4 November 2019

प्रशासन नेमकं शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यासाठी- नारायण लोखंडेप्रतिनिधी-भोकरदन

कधी सुलतानी तर कधी आस्मानी संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे.नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने वाहून नेला.नुकसानीचा निश्चित आकडा सांगणे कठीण आहे. सरकारची मदत काय किंवा विम्याची जोखीम रक्कम काय ही तोकडीच असणार आहे.तरी पण यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला होता.पिकांचे पंचवीस टक्क्यांच्या वर नुकसान झाले तर सरसकट पंचनामे केले जातात व तीस टक्क्यांच्यावर नुकसान झाले असल्यास त्यांना मदत दिली जाते. यावेळी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विमा कंपनीने प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याच्या आधारे कायद्यानुसार शेतकऱ्यांना सरसकट मदत करणे गरजेचे आहे.परंतु असे न करता विमा कंपनी शेतकऱ्यांकडून वैयक्तिक अर्ज मागून घेऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळून शेतकऱ्यांची अवहेलना करीत आहे. शेतकऱ्यांकडून नुकसान झालेल्या पिकांचे अर्ज,सातबारा, पावती,आधार कार्ड घेऊन शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक भुर्दंड टाकत आहेत.विमा कंपनीचा तालुक्याला एक प्रतिनिधी आहे.तालुक्यात हजारों लोकांचे नुकसान झालेले आहे.
त्यांचे अठ्ठेचाळीस तासात पंचनामे पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे सरसकट नुकसानभरपाई देणे अपेक्षित गरजेचे असतांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नशिबी रांगेत उभा राहण्याची वेळ आली आहे. झालेल्या नुकसानीचा अर्ज विमा कंपनीच्या प्रतिनिधीला देण्यासाठी तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या आहेत. जालना जिल्हा प्रशासनाने तर याबाबत कहरच केला आहे. त्यात भोकरदन तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झालेली असून अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. याबत निवेदन देऊन पंधरा दिवस उलटून सुद्धा प्रशासन उदासीन दिसून येते यावरून कळून येतेच.त्यातच अधिकारी कधी म्हणतात सातबारा ची आवश्यकता आहे, दुसऱ्या पत्रात सांगतात सातबारा ची गरज नाही,तिसरा सांगतो कृषी कार्यालयात कागदपत्रे दिले असले तरी पुन्हा गावात आलेल्या ग्रामसेवकाकडे ही कागदपत्रे द्या,चोथा फर्मान काढतो अर्जाची माहिती द्या,पाचवा अधिकारी म्हणतो आवश्यकता नाही. या 'गाढवाचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ' अश्या स्थितीत या सगळ्यात भरडला जातोय तो सर्वसामान्य शेतकरी. प्रशासन हे शेतकऱ्यांसाठी काम करते का विमा कंपन्यांसाठी ? हा प्रश्न पडतोय.तसेच अनेक गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असतांना सरपंच महोदय मात्र स्वहिताचे काम करतांना दिसून येत आहे. विमा भरतेवेळी  कृषिविभागाकडून जशी जाहिरात बाजी केली जाते तशीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे.यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेऊन बळीराजाला पूर्णपणे सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

No comments:

Post a comment